राज्यात भोंग्यावरुन वातावरण तापलं, रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावानं एक पाऊल पुढं टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:06 PM2022-04-29T17:06:48+5:302022-04-29T17:49:35+5:30
शिवाजी गोरे दापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर ...
शिवाजी गोरे
दापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर गावाने मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. या गावातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी एकत्र येत तब्बल १०० वर्षांचा सलोख्याचा करार केला आहे.
काही ना काही धार्मिक मुद्दे पुढे आणून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो. मात्र, त्या साऱ्याचा परिणाम गावातील शांततेवर होऊ न देण्याचा निर्णय सोंडेघर वासीयांनी घेतला आहे. आजपर्यंत टिकून असलेला सामाजिक सलोखा यापुढेही कायम राहायला हवा, यासाठी २५ एप्रिलला ग्रामस्थांनी एकत्र बसून १०० वर्षांचा करार केला आहे.
बाराशे लोकवस्तीचे हे गाव. गेली अनेक वर्षे मुळातच येथे शांतता आहे. कोणताही सामाजिक, धार्मिक वादविवाद नाही. हीच शांततेची प्रथा पुढील पिढीकडे हस्तांतरित व्हावी, अशी अपेक्षा आता बुजुर्ग मंडळी करीत आहेत. गावातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. तीनही धर्मातील सण, उत्सवात सर्वजण एकत्रच असतात.
काही मतभेद किंवा कौटुंबिक, धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मातील बुजुर्ग मंडळी एकत्र बसून सामोपचाराने गावातल्या गावात वाद मिटवतात. त्यामुळे या गावातील वाद वेशीबाहेर जात नाहीत. गावातील कोणताही वाद पोलीस स्थानकापर्यंत नेला जात नाही. हेच वातावरण कायम राहावे, यासाठी तंटामुक्तीच्या माध्यमातून गावात सर्वानुमते सामाजिक सलोख्याचा शंभर वर्षांचा लिखित करार करण्यात आला.
ऐतिहासिक करार
गावातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारा हा करार भावी पिढीलाही बंधनकारक राहणार आहे. गेली काही वर्षे शांत असलेले हे गाव कायम शांतच राहावे, यासाठी दिनांक २५ एप्रिलला गावात एक बैठक झाली. या बैठकीला दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पालगडचे बीट अंमलदार विकास पवार, अंमलदार मिलिंद कदम उपस्थित होते. त्यांनीही या ऐतिहासिक करारात मोलाची भूमिका बजावली.
जिल्ह्यातील दुसरे गाव
याआधी सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी दापोली तालुक्यातीलच बुरोंडी गावातही १०० वर्षांचा सलोख्याचा करार करण्यात आला आहे. आता सोंडेघर हे दुसरे गाव बनले आहे.