कोरोना घटताच राजकारण तेजीत, बैठकांवर बैठका अन् दौरे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:22 PM2020-11-10T15:22:54+5:302020-11-10T15:26:48+5:30
coronavirus, politics, ratnagirinews आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होताच जिल्ह्यात काही राजकीय पक्षांचे दौरे व बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. तसेच संघटना बांधणीही सुरू झाली आहे.
चिपळूण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होताच जिल्ह्यात काही राजकीय पक्षांचे दौरे व बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. तसेच संघटना बांधणीही सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव कमालीचा घटला आहे. दिवसागणिक आढळणारी बाधित रुग्णांची संख्याही घटली आहे. परिणामी कोरोनाचा जोर ओसरताच राजकीय पक्ष संघटना वाढीसाठी सरसावले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८,५१६वर पोहोचली असून, ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दौरे आणि बैठका वाढल्या आहेत. विशेषतः बुथ कमिट्या स्थापन करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व २०२४ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी काम सुरु केले आहे. त्यासाठी काहीवेळा नियम धाब्यावर बसवून कार्यकर्ता मेळावा, शिबिर व अन्य कार्यक्रम राबविले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा दौरा केला. त्यापाठोपाठ खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, तसेच आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र चव्हाण, युवा सेना नेते अतुल लोटणकर यांचे दौरे झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा दौरा झाला. त्यांनीही संघटना बांधणीवर भर देण्याचे आवाहन केले आहे.