corona virus चालकाच्या प्रवेशाने कर्मचारी, अधिकाऱ्यांची धावपळ --‘रेडझोन’मधून चालक आलेला कळताच जिल्हा परिषदेत उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:08 PM2020-05-11T18:08:06+5:302020-05-11T18:15:49+5:30
तत्काळ कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी इमारत रिकामी केली़ त्यानंतर ते सर्वजण जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची भेटले़ बने यांनी संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले़ संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली़ त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही वेळातच कामाला सुरुवात केली़ संबंधित चालकाला आता घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रेडझोन क्षेत्रातून आलेल्या चालकाने अचानक प्रवेश केल्यामुळे तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती़ ताबडतोब त्या संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले़ त्यानंतर पुन्हा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी भीतीच्या छायेत कामाला सुरुवात केली़
मागील आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक स्वर्गवासी झाल्याने ते सांगली येथील गावाला गेले होते़ सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे़ त्यामुळे सांगली जिल्हा रेडझोनमध्ये आहे़ सांगलीतून आलेल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे़ त्यामुळे त्यांच्याबरोबर गेलेल्या चालकालाही क्वॉरंटाईन होणे आवश्यक होते़ मात्र, त्या चालकांने सोमवारी दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमाराला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर संबंधित चालकाने तेथील टेबलावर आपला मास्क काढून ठेवला़ चालक रेडझोनमधून आल्याचे यापूर्वीच समजले होते़ त्यामुळे त्या इमारतीमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची धावपळ उडाली़.