सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवार यांनी विरोधकांना रोखठोक सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:14 PM2024-09-24T13:14:09+5:302024-09-24T13:15:25+5:30
चिपळूण : महायुती सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज इतका चढला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाण्याची मजल गेली ...
चिपळूण : महायुती सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज इतका चढला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाण्याची मजल गेली आहे. काय सांगावं या लोकांना. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे. काही मर्यादा आहेत की नाही? माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य वारंवार करतोय, त्याला रोखण्यापेक्षा, कारवाई करण्यापेक्षा त्याची पाठराखण करण्याची भूमिका घेतली जाते. सत्तेची इतकी मस्ती आली असेल तर लक्षात ठेवा, लवकरच जनता तुमची योग्य जागा तुम्हाला दाखवेल, अशा रोखठोक शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
चिपळूण बहादूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना शरद पवार यांनी महायुतीच्या सरकारवर तोफ डागली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब पाटील, पक्ष निरीक्षक बबन कणावजे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ लिमये, सरचिटणीस प्रशांत यादव, तसेच राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
हल्ली जाणीवपूर्वक हवाई प्रवास टाळून रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो. कारण या प्रवासात अनेक आपले लोक भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. विशेष म्हणजे परिसराची व रस्त्यांची माहिती मिळते. पण, ज्या मार्गाने मी आलो, त्या चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील रस्त्याची झालेली अवस्था अत्यंत बिकट असून, असा रस्ता मी देशात कुठेच बघितलेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्थाही तीच आहे. हे रस्ते बघून माझी मान शरमेने खाली गेली. संबंधितांना मी या संदर्भात सांगणार आहे, अशी टीका त्यांनी केली.
यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष पवार यांनी पी. के. सावंत, नाना जोशी, बाळासाहेब माटे, गोविंदराव निकम या सर्वांची आवर्जून नावे घेतली. या सर्वांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. नेहमी माझ्याबरोबर राहिले. नंतरच्या काळात रमेश कदम, राजाभाऊ लिमये यांनीही कोकणात पक्षासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्याच पठडीत आता तरुण प्रशांत यादव यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे काम आणि आजचा जनसमुदाय बघितल्यानंतर आपण सर्वांनी आता प्रशांत यादव यांच्या पाठी उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
तटकरे यांना टोला
‘मी येतोय’ असे बोलल्यावर येथे आलोय, येथून रायगडलाही जाणार आहे. तिथून कुठे जाईन याचा थांगपत्ता लागणार नाही, उगाच माझ्या नादाला लागू नका, असा जोरदार टोलादेखील त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता लगावला.