एका फोनने कमाल केली अन् ४८ तास प्रवास करून 'ती' चीनमधून रत्नागिरीत आली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:02 PM2020-02-13T12:02:38+5:302020-02-13T15:22:52+5:30

कोरोनाग्रस्त चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या येथील तीन विद्यार्थिनी अखेर मायदेशात परतल्या आहेत. या तिघींमधील सादिया हिने तेथील परिस्थिती आणि आपला प्रवास याबाबत माहिती दिली.

As soon as they set foot on the ground, tears were shed in their eyes | एका फोनने कमाल केली अन् ४८ तास प्रवास करून 'ती' चीनमधून रत्नागिरीत आली!

एका फोनने कमाल केली अन् ४८ तास प्रवास करून 'ती' चीनमधून रत्नागिरीत आली!

Next
ठळक मुद्दे - सादिया मुजावरने मांडला प्रवास- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या फोनमुळे भारतात परत येण्याचा विश्वास मिळाला

खेड : चीन सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात शट - डाऊन जाहीर केल्याने आमचे खाण्या - पिण्याचे हाल होऊ लागले होते. त्यातच प्रसारमाध्यमांद्वारे येणाऱ्या बातम्यांमुळे आम्हाला काळजी वाटू लागली होती. मात्र, त्याच सुमारास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा मला फोन आला. त्यामुळे आपण भारतात परत येऊ शकतो, असा विश्वास निर्माण झाला आणि दुसऱ्याच आठवड्यात शांघाय विमातळावरून मायदेशीचा प्रवास सुरु झाला. एस. टी.तून उतरून खेडच्या जमिनीवर पाय ठेवला आणि माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, अशी हकिगत चीनहून परतलेल्या सादिया बशीर मुजावर हिने सांगितली.

कोरोनाग्रस्त चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या येथील तीन विद्यार्थिनी अखेर मायदेशात परतल्या आहेत. या तिघींमधील सादिया हिने तेथील परिस्थिती आणि आपला प्रवास याबाबत माहिती दिली. सादियाने नांतोंग येथून सुमारे २०० किमी शांघाय शहरापर्यंत तिने टॅक्सीने प्रवास केला. त्यानंतर चीनच्या स्प्रिंग एअरलाइन्सने बँकॉक, अहमदाबाद असा सुमारे दोन दिवस व दोन रात्री सलग प्रवास करून आपल्या घरी आली. नांतोंग विद्यापीठात सादिया हिच्या द्वितीय वर्षाच्या वर्गात सुमारे ५० ते ५५ भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा जानेवारी महिन्यात दिली. एक महिन्याच्या सुट्टीनंतर २३ फेब्रुवारी रोजी त्यांचे दुसरे सेमिस्टर सुरू होणार होते. मात्र, तत्पूर्वीच कोरोना या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली. या साथीमुळे चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. व्हायरसबाबतच्या बातम्यांमुळे आम्ही घाबरलो होतो. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर आम्ही सुखरूपपणे भारतात पोहोचू, हा विश्वास निर्माण झाल्याचे सादियाने ‘लोकमत’ला सांगितले.

खेडचे माजी नगरसेवक बशीर मुजावर यांची मुलगी सादिया ही २०१८ पासून चीन येथील नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. उर्वरित वैद्यकीय शिक्षण त्याच विद्यापीठात  पूर्ण करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले. साथ आटोक्यात आल्यावर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सूचना मिळेल, मग आपण चीनला जाऊ, असे सादियाने सांगितले.

जिल्हाधिकारी यांचा थेट संपर्क झाल्याने मार्ग सुकर
वेगवेगळ्या बातम्यांमुळे सादियाच्या आई-वडिलांची झोप उडाली होती. हजारो मैल दूर असलेली आपली मुलगी कशी असेल, ही चिंता त्यांना सतावत होती. खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ चीनमधील भारतीय वकालतीमार्फत सादियाशी संपर्क साधला. यावेळी चव्हाण यांनी आम्ही तुम्हाला लवकरच भारतात परत आणू असे सांगितले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भारतीय वकालतीच्या माध्यमातून थेट चीन सरकारशी संपर्क साधल्यानंतर चीनमध्ये अडकून पडलेल्या सादिया मुजावर हिचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

Web Title: As soon as they set foot on the ground, tears were shed in their eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.