काजळी नदी घेतेय मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:04+5:302021-03-26T04:32:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथून दुथडी भरून वाहणारी काजळी नदी गाळामध्ये भरून गेली आहे. परिणामी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथून दुथडी भरून वाहणारी काजळी नदी गाळामध्ये भरून गेली आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात परिसरातील बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली जातात. तर गाळामुळे नदीपात्र वर आल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येथील पंचक्रोशीतील जनतेवर येत होती. या काजळी नदीतील संपूर्ण गाळ काढण्याची मोहीम ग्रामस्थांनी हाती घेतली आहे. यामुळे काजळी नदी आता गाळमुक्त होऊन मोकळा श्वास घेणार आहे.
गाळ काढण्याच्या या मोहिमेला व्यापारी, ग्रामस्थ, पतसंस्था आणि नाम फाउंडेशनचा मोठा हातभार लागत आहे. गेला महिनाभर गाळ काढण्याची मोहीम सुरू आहे. या उपक्रमामुळे पूरमुक्ती तसेच पाणीटंचाईला आळा बसण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील देवडे येथील सह्याद्रीच्या खोऱ्यातून ही काजळी नदी उगम पावली असून, ती कोंडगाव साखरपा, बावनदी अशी वाहत आहे. काजळी नदीतील गाळ काढण्याची मोहीम पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी देवडे गावाने हाती घेतली होती. हा गाळ देवडे परिसरातील नदीपात्रातीळ काढण्यात आला. सध्या साखरपा, कोंडगाव येथे बाजारपेठे नजीक गाळाचा मोठा संचय झाला आहे. या गाळात झाडेझुडपे वाढल्याने नदीपात्र पूर्णतः होरली आहेत. यामुळे पुराची समस्या तसेच उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. म्हणूनच येथील ग्रामस्थांनी या काजळी नदीची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यापासून हा गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या करिता नाम फाउंडेशन, व्यापारी मंडळ,दत्त देवस्थान आणि दत्तसेवा पतसंस्था यांच्या सहकार्य लाभत आहे. गाळ काढल्यामुळे नदीपात्र स्वच्छ होणार आहे. शिवाय पात्राची खोलीही वाढेल यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न आणि पुराचा धोकाही कमी होणार आहे. या मोहिमेमुळे काजळी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे.