सॉरी पप्पा, मी आईकडे जातोय!; लांजातील तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:34 AM2019-11-16T05:34:06+5:302019-11-16T05:34:10+5:30
आठ वर्षापूर्वी आईच्या मृत्यूचा धक्का अजूनही मनावर कायम असलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली.
लांजा (जि.रत्नागिरी) : आठ वर्षापूर्वी आईच्या मृत्यूचा धक्का अजूनही मनावर कायम असलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. विनय चंद्रकांत जाधव (२६ रा. हर्दखळे, ता.लांजा) असे या तरूणाचे नाव आहे. ‘सॉरी पप्पा, मी आईकडे जातोय’, अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
विनयच्या आईने आठ वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचा विनयला खूप धक्का बसला होता. त्यानंतर विनयला त्याच्या वडिलांनी मुंबई येथे नेले. तेथे एका खासगी कंपनीत तो काम करत होता. बुधवारी तो हर्दखळे येथे आला. त्या रात्री ९.३० वाजता त्याने घराचा दरवाजा लावून घेतला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याला हाका मारल्या. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी दरवाजावरील खिडकीतून पाहिले असता गळफास लावून घेतल्याचे दिसले. तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पंचनामा करताना पोलिसांना विनयने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ‘साँरी पप्पा, मला आता सहन होत नाही आहे. मम्मी गेली आहे तिथे मी जात आहे. जशा मम्मीच्या वस्तू सांभाळून ठेवल्या आहेत, तशाच माझ्या वस्तूही सांभाळून ठेवा‘, असे विनयने चिठ्ठीत लिहिले आहे.