नाटेत घुमला ‘अणुऊर्जा हटाव’चा आवाज
By admin | Published: October 2, 2016 11:40 PM2016-10-02T23:40:03+5:302016-10-02T23:40:03+5:30
दोन दिवसांच्या आंदोलनाला सुरुवात : राजन साळवी यांच्यासह वैशाली पाटील, ग्रामस्थांचा सहभाग
राजापूर : ‘नको अणुऊर्जा’, ‘अणुऊर्जा हटाव- कोकण बचाव’ अशा गगनभेदी डरकाळ्या फोडीत नाटेमधील सोनारगडगा येथील धरणे आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद लाभला. आमदार राजन साळवी यांच्यासह पर्यावरण नेत्या वैशाली पाटील व अन्य मान्यवर या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत कोकणचे नुकसान करणारा विषारी प्रकल्प येथून हद्दपार झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.
देशातील सर्वाधिक मोठ्या क्षमतेचा म्हणजेच दहा हजार मेगावॅट एवढी अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात येऊ घातला असून, हा प्रकल्प विनाशकारी आहे. त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणासह मानवी जीवन व मच्छिमारी, बागायती, भातशेती यावर होईल, या भीतीने स्थानिक जनता प्राणपणाने संघर्ष करीत आहे. त्यानुसार दोन दिवसांचे धरणे व उपोषण आंदोलन जनहक्क समिती व शिवसेना यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी समस्त आंदोलक नाटेमधील शहीद तबरेज सायेकर चौकात जमा झाले. त्याठिकाणी दिवंगत तबरेजच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी आमदार राजन साळवी, मच्छिमार नेते अमजद बोरकर, पर्यावरण नेत्या वैशाली पाटील, जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, सचिव दीपक नागले, विभागप्रमुख राजा काजवे, मज्जीद गोवळकर, मंगेश चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर सर्वजण सोनार गडग्याकडे आंदोलनस्थळी निघाले.
या प्रकल्प परिसरातील प्रकल्पाची संरक्षक भिंत व नाटे पोलिस ठाणे या एक किलोमीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला असून, १४४ कलम जिल्हा प्रशासनाने लागू केले आहे. केवळ सोनारगडगा याच ठिकाणी धरणे आंदोलनाला परवानगी मिळाली होती. त्यानुसार तेथे सर्वजण जमले, त्यावेळी या घातक प्रकल्पाविरुद्ध घोषणा दिल्या जात होत्या. काळे झेंडे दाखविले जात होते, तर आंदोलक संतप्तपणे प्रकल्पाविरोधात घोषणा देत होते. त्यावेळी गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला होता. आंदोलनातील महिलादेखील जोरदार घोषणा देत होत्या. (प्रतिनिधी)
खासदार आज येणार
यानंतर आज, सोमवारी खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.