रत्नागिरीच्या सौरिश कशेळकरला कै. लिला रामचंद्र फडके बुद्धिबळ स्कॉलरशिप
By मेहरून नाकाडे | Published: January 17, 2024 04:38 PM2024-01-17T16:38:06+5:302024-01-17T16:39:02+5:30
रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली २०२३-२४ वर्षातील बुद्धिबळ स्कॉलरशिप रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याला जाहीर करण्यात आली आहे. मूळचे चिपळूण परंतु सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाऊटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजीच्या स्मृति बुद्धिबळ स्कॉलरशिप सुरू केली आहे. रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या स्कॉलरशिपचे स्वरूप आहे.
बुद्धिबळ खेळात व विशेष करून क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धांत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवान बुद्धिबळपटूला प्रतिवर्षी ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. बुद्धिबळ स्कॉलरशिपचे हे पहिलेच वर्ष असून पुढील वर्षीपासून स्कॉलरशिपच्या व्याप्तीत वाढ करण्यात येणार आहे. खेळाडूंना रत्नागिरी बाहेर जाऊन खुल्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने इतर आर्थिक योजनाही प्रतिवर्षी राबविण्यात येणार आहेत.
सौरिश कशेळकर याने गत वर्षी बुद्धिबळात सातत्याने चांगल्या कामगिरीची नोंद केली. गोव्यात पार पडलेल्या कै. श्री वासुदेवा डेम्पो खुल्या फिडे मानांकित क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सौरिशने आपल्या फिडे गुणांकनात तब्बल १८१ गुणांची वाढ केली होती. जलद फिडे स्पर्धेत कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांतून सहभागी झालेल्या एकूण एकशे ऐंशी बुद्धिबळपटूतून सौरिशने चाैथा क्रमांक पटकाविला होता.