स्थानकाच्या आवारातच दारूच्या बाटल्यांचा ढिग
By admin | Published: April 17, 2017 06:30 PM2017-04-17T18:30:57+5:302017-04-17T18:30:57+5:30
भाजपच्या खेड शहरातील स्वच्छता अभियान मोहिमेला प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
खेड : भारतीय जनता पक्षाच्यावतीने खेड शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत बसस्थानकात राबविलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानकप्रमुखांनाच याबाबत जाब विचारला. आगारातील अस्वच्छतेचा पाढाच यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वाचला.
शहरातील स्वच्छता अभियान मोहिमेला भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून प्रारंभ केला. यावेळी बसस्थानकाबरोबरच कार्यकर्त्यांनी पालिकेच्या जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीकचा परिसर स्वच्छ केला. हा परिसर स्वच्छ करताना ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि फाटके कपडे आढळून आले. बसस्थानकातील अस्वच्छतेमुळे येथील कंत्राटदाराबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह या अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी खेड पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी याबाबत कडक उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
या मोहिमेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू रेडीज, शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, सरचिटणीस आंब्रे, नागेश धाडवे, उदय बोरकर, चंद्रकांत सुतार, संजय बुटाला, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, संतोष दोडेकर, संजिवनी शेलार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)