सभापती अधिकृत ‘पीए’विना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 11:49 PM2016-01-25T23:49:16+5:302016-01-25T23:49:16+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाबद्दल नाराजी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींना अद्यापही अधिकृतरित्या स्वीय सहाय्यक न देण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांच्याही कानी घालण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तिन्ही स्वीय सहाय्यकांना आपल्या विभागात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्वीय सहाय्यक आपल्या विभागात हजर झाले होते. त्यावेळी सर्व सभापतीपदांचा कारभार अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्याकडे होता. राजापकर यांनी त्यावेळी अध्यक्ष पदाच्या दालनातील स्वीय सहाय्यकांना आपण सभापतींच्या दालनात नेमू शकत नाही. त्यासाठी प्रशासनाने तत्काळ पूर्वीचे स्वीय सहाय्यक द्यावेत, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पूर्वीचेच स्वीय सहाय्यक सभापती दालनात देण्यात आले होते.
सभापतीपदाची निवडणूक होऊन आठवडा उलटला तरी अद्याप त्यांना अधिकृतरित्या स्वीय सहाय्यक प्रशासनाकडून देण्यात आलेले नाहीत. शिक्षण व वित्त सभापती विलास चाळके, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर आणि महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे यांच्याकडे पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचेच स्वीय सहाय्यक त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे अधिकृतरित्या अजूनही त्यांना स्वीय सहाय्यक देण्यात आलेले नाहीत. ही बाब काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या कानी घातली. त्यानंतर पालकमंत्र्यांकडून प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आली आहे.
सभापतींची निवड झाल्यानंतर तत्काळ स्वीय सहाय्यकांची नियुक्ती करणे आवश्यक असतानाही कानाडोळा केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)
महिला कर्मचारी अधिक
सोमवारी सायंकाळी उशिरा मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी तिन्ही सभापतींना स्वीय सहाय्यक घेण्यासाठी वेगवेगळ्या विभागातील ४५ कर्मचाऱ्यांची यादी पाठवली. या यादीतून स्वीय सहाय्यकाची सभापतींनी निवड करावयाची आहे. मात्र, या यादीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे.