संवेदनशील गावांवर विशेष लक्ष

By Admin | Published: June 14, 2016 09:20 PM2016-06-14T21:20:33+5:302016-06-15T00:05:54+5:30

अनिरूद्ध आठल्ये : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, कक्ष सुरू

Special attention to sensitive villages | संवेदनशील गावांवर विशेष लक्ष

संवेदनशील गावांवर विशेष लक्ष

googlenewsNext

प्रतिवर्षाप्रमाणे उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे व पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामध्ये पावसाचे बाहेरील दूषित पाणी मिसळल्यामुळे त्यात केरकचरा, उघड्यावरील मैला गेल्यामुळे ते पाणी दूषित होते, अशा पाण्याच्या सेवनामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर यांसारख्या जलजन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच दूषित माती व दूषित पाण्याशी मानवाचा संपर्क आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. या साथीमध्ये प्राणीहानी व वित्तहानी होते. त्याचबरोबर शारीरिक, मानसिक व कौटुंबीक स्वास्थ्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी खास दक्षता घेण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या आजारांबाबत आरोग्य यंत्रणेने कोणती खबरदारी घेतली आहे, याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ‘लोकमत’शी थेट संवाद साधला.


प्रश्न : पावसाळ्यात साथीचे कोणते आजार होऊ शकतात?
उत्तर : साथीच्या रोगांपैकी सर्वसाधारणपणे ६० टक्के रोग हे दूषित पाणी पिण्यामुळे होतात. महाराष्ट्रात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या मृत्यूपैकी २५ टक्के मृत्यू हे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारामुळे होतात. त्यामुळे दूषित पाणी म्हणजे एक प्रकारचे विषच आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो. ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आहे, रोग प्रतिकार शक्ती पुरेशी नाही, अशा लोकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. अतिसार, विषमज्वर आणि काविळ यांसारखे आजार पावसाळ्यात अधिक प्रमाणात होतात.
प्रश्न : आरोग्यदृष्ट्या संवेदनशील गावे आहेत काय?
उत्तर : होय! जिल्ह्यातील २१ गावे साथउद्रेक, ३२ जोखीमग्रस्त तसेच २९ नदीकाठच्या गावामध्ये जास्त लक्ष केंद्रीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. साथग्रस्त संभाव्य गावांना आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी वेळोवेळी भेट देऊन साथ रोगविषयक पाहणी करणे, या गावांतील दरमहा पाणी नमुने घेऊन टी. सी. एल. नमुने गोळा करुन प्रयोगशाळेकडे पाठवणे, सर्वेलन्स करून जलजन्य आजाराचे रुग्ण शोधून तत्काळ उपचार देणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या साथ उद्रेक गावांमधील जालगाव तेरेवायंगणी, किंजळेबोरज, कोंडकारुळ, अडूर, वेळणेश्वर, सडे जांभारी, मालघर, सावर्डा, नायशी, मार्गताम्हाणे, निवे बु, दुर्गवलेवाडी, मुरुगवाडा, गावडेआंबेरे, हातीस, कशेळी, धुंदरे, पूनस, कात्रादेवी ही आहेत.
प्रश्न : जोखीमग्रस्त गावे कोणती ?
उत्तर : पेवे, पणदेरी, अडखळ, निगडी, केंगवळ, गोठे टाकेडे कुडावळे, उवली, वाघिवणे सार्पिली कशेडी, सुमारगड पाचेरी सडा, कुडली, तोंडली, पातेपिलवली, वीर, धामणवणे, पुऱ्ये, पीरधामापूर, परचुरी, बागपाटोळे, कुरंग, कोंडगे, विलवडे, माचाळ, चिंचुर्टी, कोलधे, मोगरे, तिवरे, काजिर्डा ही गावे जोखीमग्रस्त असून, या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे.
प्रश्न : पाणी दूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
उत्तर : विहिरीजवळ गुरे-ढोरे धुणे, कपडे धुणे टाळावे. पिण्याच्या पाण्याजवळ शौचास बसू नये. शौच विधीसाठी संडासाचा वापर करावा. केरकचरा आणि सांडपाण्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून पावसाळ्यात तसेच पुराच्या वेळी हा केरकचरा आणि मैला पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळणार नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये शक्यतो हात बुडवू नये. पिण्याचे पाणी काढण्यासाठी वगराळ्याचा वापर करावा. पिण्याचे पाणी उंचावर झाकून ठेवावे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता बाळगल्यास पाणी दूषित होण्यापासून आपण रोखू शकतो आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार आपण टाळू शकतो.
प्रश्न : साथ नियंत्रणासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे काय?
उत्तर : जिल्हास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, इमर्जन्सी कीट तयार केलेल्या आहेत. भात कापणीच्या वेळी सर्प व विंचूदंशाचं प्रमाण अधिक असते. यासाठी सर्प व विंचूदंशांचा औषधसाठा सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. लेप्टोस्पायरोसिसबाबतचीही औषधे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आलेली आहेत.
प्रश्न : लेप्टोस्पायरोसिसबाबत कोणती प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात आली आहे?
उत्तर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सदैव सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांचे रूग्ण आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, अशीही सूचना देण्यात आली आहे.
- रहिम दलाल


साथ नियंत्रण पथके स्थापन
जिल्हास्तरावर एक, तर तालुकास्तरावर नऊ तसेच सर्व ६७ आरोग्यकेंद्रांमध्ये २४ तास साथ नियंत्रण कक्ष सुरु आहे. तसेच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आलेली आहेत. सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी औषधसाठा पुरेशा प्रमाणात ठेवलेला असून, इमर्जन्सी कीट साथ नियंत्रणासाठी ठेवण्यात आलेली आहे.
रिक्त पदांचा ताण
जिल्ह्यात १३१ वैद्यकीय अधिकारीपदे मंजूर असून, त्यापैकी सध्या ८८ पदे भरलेली आहेत. एकूण ४३ पदे रिक्त आहेत. सध्या बीएएमएस पदे कंत्राटी स्वरुपात आरोग्य अभियान अंतर्गत भरण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. वैद्यकीय अधिकारीपदे रिक्त असली तरीही आरोग्य केंद्रामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्यसेविका, सेवक ही पदे काही प्रमाणात भरण्यात आलेली आहेत.

Web Title: Special attention to sensitive villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.