गोवंश हत्या रोखण्यासाठी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:30 PM2020-01-29T17:30:08+5:302020-01-29T17:32:16+5:30
गोवंश हत्या व विनापरवाना जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी अतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी नेमण्यात आली आहे. शिवाय १० ठिकाणी नव्याने चौकी तयार केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण : गोवंश हत्या व विनापरवाना जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी अतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी नेमण्यात आली आहे. शिवाय १० ठिकाणी नव्याने चौकी तयार केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यातील कामथे व पिंपळी येथे घडलेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. मुंढे बोलत होते. ते म्हणाले की, या घटनांविषयी पोलीस यंत्रणेकडून गांभीर्याने तपास केला जात आहे. या प्रकरणामध्ये जुने-नवे कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
तत्पूर्वी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी १० ठिकाणी नव्याने नाकाबंदी केली जाणार असून, २५ अतिरिक्त पोलीस कर्मचारी त्यासाठी नेमण्यात आले आहेत. नियमित मार्गाबरोबरच आडमार्गावरही आता लक्ष ठेवले जाणार आहे. पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.
सावर्डे येथील जनावरांच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. ही गाडी नेमकी आली कोठून व ती पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास का आली नाही, याची कारणे शोधली जातील. याविषयी नागरिकांचीही तितकीच जबाबदारी असून, सीसीटीव्हीबाबत नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे.
काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास किंवा इमारत व घरावर सीसीटीव्हीची सुविधा उभारताना रस्ता दिसेल, अशी रचना करणे आवश्यक आहे, जेणेकरून पोलिसांच्या तपासात मदत होईल व सामाजिक सुरक्षा राखली जाईल. त्यासाठी काही सामाजिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे आवाहन केले जाणार असल्याचेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व सावर्डेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांच्यासह सनातनचे हेमंत चाळके, भाजपचे रामदास राणे, माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, पूर्व विभाग संघर्ष समितीचे प्रताप शिंदे, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक रतन पवार, मेजर सुरेश शिंदे, मनोज जाधव, प्रशांत परब आदी उपस्थित होते.
तातडीची बैठक
गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर येथील काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्व संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची डॉ. मुंढे यांनी पोलीस स्थानकात तातडीची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.