खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:16+5:302021-09-08T04:38:16+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार कोरोना प्रतिबंधक डोस ...
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांना १ लाख ४० हजार कोरोना प्रतिबंधक डोस दिले असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन, मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीसाठी ७० हजार तर सिंधुदुर्गासाठी ६९ हजार डोस दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, एक कोकणवासीय म्हणून कोकणातील सर्व लोकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्राप्त डोस दोन दिवसांत नागरिकांना द्यावेत, अशा सूचना मंत्री सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही लस मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनीही प्रयत्न केले आहेत.