ज्या कंपनीत काम केले तिथेच दिली भेट, विशेष पोलिस महानिरीक्षक रमले आठवणीत
By अरुण आडिवरेकर | Published: February 15, 2024 01:11 PM2024-02-15T13:11:32+5:302024-02-15T13:13:27+5:30
लोटे येथील घरडा केमिकल कंपनीला संजय दराडे यांची अचानक भेट
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जाेरावर विशेष पाेलिस महानिरीक्षक पदापर्यंत पाेहोचलेले अभियंता संजय दराडे यांनी आपल्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी लाेटे (ता. खेड) येथील घरडा केमिकल कंपनीला बुधवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधून आठवणींना उजाळा दिला.
काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आठ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बुधवारी रत्नागिरी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी घरडा केमिकल कंपनीला भेट देऊन तेथील सुरक्षिततेबाबत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते.
दराडे यांनी केमिकल इंजिनिअरिंग केले असून, २०२१-२०२२ या कालावधीत घरडा कंपनीत मेटनन्स इंजिनिअर म्हणून काम केले हाेते. एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नाेकरी साेडली आणि केंद्रीय लाेकसेवा आयाेगाची परीक्षा देऊन ते पाेलिस दलात सामील झाले. आता पाेलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण काम केलेल्या घरडा कंपनीला त्यांनी अचानक भेट देऊन सहकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांच्यासह त्यांचे जुने सहकाऱ्यांनाही गहिवरून आले.
संजय दराडे यांनी सांगितले की, महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये म्हणून ही भेट हाेती. माझ्या वाटचालीत माझ्या सहकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांना भेटून आनंद झाला. मी प्रशिक्षक म्हणून हाेताे पण सहकाऱ्यांनी खूप काही शिकविले. असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी आयपीएस अधिकारी व्हावे अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा हाेती. त्यामुळे नाेकरी साेडून युपीएससीची तयारी सुरू केली. मेहनत, चिकटी यामुळे सन २००५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालाे. विविध भागांत काम केल्यानंतर इथंपर्यंत पाेहाेचलाे आहे. अतिशय लांब असा हा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मॅनेजर’ आले की गुल
या भेटीत ते जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना रमून गेले हाेते. सहकाऱ्यांसाेबत शिकता-शिकता खूप चांगला काळ गेला. त्यावेळी कडक शिस्तीचे मॅनेजरही हाेते. ते आले की, आम्ही सगळे पळून जायचाे, अशी जुनी आठवण विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितली. सुरुवातीला आल्यावर वास यायचा पण दाेन आठवड्यानंतर शरीरानेही हा वास स्वीकारला आणि वास येणे बंद झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.