चिपळूण नगर परिषदेची विशेष सभा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:08+5:302021-05-08T04:34:08+5:30

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासाठी रुग्णवाहिका व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा शुक्रवारी आयोजित केली होती. ...

Special meeting of Chiplun Municipal Council canceled | चिपळूण नगर परिषदेची विशेष सभा रद्द

चिपळूण नगर परिषदेची विशेष सभा रद्द

Next

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासाठी रुग्णवाहिका व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा शुक्रवारी आयोजित केली होती. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या सभेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकत सभा पुढे घेण्याची मागणी केली. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी नगर परिषदेतर्फे शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. याशिवाय तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही तशा सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेत नगरपरिषदेने रुग्णवाहिका व फवारणी साहित्य खरेदी करणे, गोवळकोट येथील नाल्यावर स्लॅबमोरी उभारणे आणि शिवनदीतील गाळ उपशाबाबत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीबाबतचा प्रस्ताव या सभेत ठेवला होता. विशेष म्हणजे, प्रथमच या सभेत नगरसेवकांना लॅपटॉपसह मोबाईलवरूनही संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध केली होती. या सभेला काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. तर काही जण घरूनच मोबाईलवर सभेत सहभागी झाले होते. भाजपचे नगरसेवकही नगराध्यक्षांच्या कक्षात थांबले होते. याचवेळी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांनी पत्र देऊन सभा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यावरून सभा सुरू होण्याआधीच नगरसेवकांमध्ये काहीशी धुसफूस झाली. अखेर ही सभा रद्द करण्याचा निर्णय झाला.

कोट

नगर परिषदेत काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित असूनही सभेला थांबले नाहीत. त्यांना मोबाईलवरूनही या सभेत सहभागी होता आले असते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक राजकारण केले. शहराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय या सभेत होणार होते. परंतु, काँग्रेसमुळे महत्त्वाची कामे लांबणीवर पडली आहेत. काँग्रेसचे हे राजकारण नक्की थांबणार तर कधी आहे?

- आशिष खातू, भाजप नगरसेवक

कोट

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत नगर परिषदेतील सभापती कक्षात केलेल्या बैठक व्यवस्थेमुळे धोका उदभवू शकत होता. त्यामुळेच ही सभा पुढे नेण्याची मागणी केली. दोन दिवसांत पुन्हा या सभेचे नियोजन करण्यात यावे, असे सुचवले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी ते मान्य केले आहे.

- कबीर काद्री, काँग्रेसचे नगरसेवक

चौकट

नगरसेवकांनी खोडली केलेली सही

या सभेसाठी उपस्थित असलेल्या काही नगरसेविका व नगरसेवकांच्या सह्या नगरपरिषदेच्या नोंदवहीत घेण्यात आल्या होत्या. मात्र, सभा पुढे ढकलण्यासाठी राजकारण शिजल्याने काही नगरसेवकांनी नोंदवहीत केलेल्या सह्या स्वतःहून खोडून टाकल्या. नगरसेवकांच्या या वर्तनाविषयी नगरपरिषदेच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.

Web Title: Special meeting of Chiplun Municipal Council canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.