विशेष निराधार योजना ठरतायत आधार
By admin | Published: April 12, 2017 03:53 PM2017-04-12T15:53:48+5:302017-04-12T15:53:48+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात ४०११२ लाभार्थी, वर्षभरात २४ कोटी ३९ लाख रूपये अनुदानाचे वाटपमात्र, दापोलीत अपंग निवृत्तीवेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही
आॅनलाईन लोकमत
शोभना कांबळे/ रत्नागिरी, दि. १२
निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजना प्रशासनाने पुरेशा प्रमाणात केलेल्या जागृतीमुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ४० हजारपर्यंत गेली आहे. मात्र, दापोलीत यावर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही. या विविध सहा योजनांसाठी वर्षभरात २४ कोटी ३९ लाख ८२ हजार ५७० एवढ्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील ४०११२ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे.
विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्ये मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थ्याला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.
प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे या सहा योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी यावर्षी दापोली तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी आढळला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये या योजनेचे लाभार्थीच नाही की, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, असा सवालही केला जात आहे.
लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, स्थानिक प्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न केल्यास या योजना गरजूंपर्यंत अधिक पोहोचतील, असे म्हटले जात आहे. त्यातच काही वेळा अपंगत्त्वाच्या दाखल्यासाठी खेटे मारावे लागत असल्यानेही या योजनेचा लाभ घेताना मर्यादा येत आहेत.
असं असलं तरीही यावर्षी या योजनेला दापोलीवगळता इतर आठ तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शासनाने या विशेष योजना ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी ‘जगणं’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका अगदी ग्रामपंचायत स्तरावरही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता या सहाही योजनांना या आर्थिक वर्षात जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.
मंडणगड तसेच दापोली येथे गत आर्थिक वर्षात अपंग निवृत्तिवेतन योजनेचा तसेच विधवा निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी नव्हता. मात्र, यावर्षी मंडणगडमध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यात अपंग निवृत्ती वेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही.
एकूण लाभार्थी संख्या
संजय गांधी अनुदान - १४७५३
श्रावणबाळ निवृत्तीवेतन - १५४४०
वृद्धापकाळ निवृत्तीवेतन - ९५२३
राष्ट्रीय कुटुंब लाभ - १४७
विधवा निवृत्तीवेतन - १११८
अपंग निवृत्तीवेतन - १३८