रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना विशेष अधिकार, निवडणूक काळासाठी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:31 PM2024-11-09T18:31:23+5:302024-11-09T18:31:55+5:30

रत्नागिरी : निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी ...

Special powers to police in Ratnagiri district, decision for election period  | रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना विशेष अधिकार, निवडणूक काळासाठी निर्णय 

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना विशेष अधिकार, निवडणूक काळासाठी निर्णय 

रत्नागिरी : निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी अधिकारी यांना पूर्ण जिल्ह्यात ९ ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसे नियमन आदेश महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३६ अन्वये पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले आहेत.

दिनांक १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३६ अन्वये पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पूर्ण जिल्ह्यात या आदेशाद्वारे २३ नोव्हेंबर २०२४पर्यंत काही अधिकार दिले आहेत.

यामध्ये मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशी वर्तणूक ठेवावी, याविषयी निर्देश देणे, मिरवणुकांचे मार्ग किंवा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणुकींच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास सार्वजनिक जागी गर्दी किंवा अडथळा होऊ न देणे. रस्ते, घाट, धक्के, जत्रा, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक जागेत ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजवण्याबाबत नियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे यांचा समावेश आहे.

तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा (लाऊड स्पिकर) उपयोग करण्याचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्याने या अधिनियमनाची कलमे ३३, ३५, ३८ ते ४१, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे, याचाही त्यात समावेश आहे.

प्राप्त अधिकारांचा योग्य विनियोग करून आपापल्या पोलिस स्थानकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखावी. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Special powers to police in Ratnagiri district, decision for election period 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.