पाेलिसांचे खास पथक घेणार फरार आराेपींचा शाेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:55+5:302021-06-18T04:22:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील फरारी आरोपींना शोधण्याची मोहीम जिल्हा पाेलीस दलाकडून हाती घेण्यात आली आहे. ‘पाहिजे आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील फरारी आरोपींना शोधण्याची मोहीम जिल्हा पाेलीस दलाकडून हाती घेण्यात आली आहे. ‘पाहिजे आणि फरारी आरोपी शोध’ ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पाेलिसांचे एक पथक तयार केले असून, या पथकाद्वारे पाेलिसांना पाहिजे असलेल्या आणि फरार आराेपींचा शाेध घेण्यात येणार आहे़
१९७२ सालापासून ते २०२१ सालापर्यंत जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे सर्व गुन्हेगार विविध प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या सर्व गुन्हेगारांची जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातून माहिती घेतली जात आहे़ त्या सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ़ गर्ग यांनी पाेलिसांचे खास पथक तयार केले आहे़ या पथकात पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्यासह पोलीस नाईक चंदन जाधव, प्रवीण खांबे, सत्यजीत दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल रियाज मुजावर, ओमकार पवार यांचा समावेश असणार आहे. पाेलिसांना हवे असलेले १९४ व ३२ फरारी आरोपींचा पाेलीस शाेध घेणार आहेत़
काही वर्षांपासून आरोपी फरार आहेत. त्यांची माहिती न्यायालयाकडून घेतली जात आहे़ काही आरोपींचा केसचा निकाल लागला असेल व जे आरोपी निर्दोष सुटले असतील अशा आरोपींचा आम्ही शोध घेत नाही, अशी माहिती या पथकाच्या निरीक्षक शैलजा सावंत यांनी दिली. या सर्व गुन्हेगारांचा पोलिसांना शोध घेण्यात यश आले तर जिल्हा गुन्हेगारी मुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.
हे पथक स्थापन झाल्यानंतर या पथकाने ११ वर्षापूर्वी सावर्डे (ता. चिपळूण) येथे अपघात करून फरार झालेल्या सोराब खान (४८, रा. शिवडी, मुंबई) याला १४ जून २०२१ रोजी धुळे येथून अटक केली. या पथकाची ही पहिलीच कारवाई आहे़ या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.