खुशखबर; स्पेशल ट्रेनचे ओझे उतरणार; वाढीव तिकीट हाेणार कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:43 PM2021-11-17T13:43:10+5:302021-11-17T13:44:51+5:30
शोभना कांबळे रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून ...
शोभना कांबळे
रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी होण्याबरोबरच कोकणातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा नियमित धावणार असून त्यांचे तिकीट दरही पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून सुमारे दीड वर्षानंतर पॅसेंजरची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच २२ मार्चपासून देशभरात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सुमारे पाच महिने रेल्वेही बंदच होत्या. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाड्या पूर्णपणे आरक्षित होत्या. त्यांचे तिकीट दरही भरमसाट होते. त्याचप्रमाणे या गाड्यांसाठी ठराविकच थांबे असल्याने सामान्य लोकांची गैरसोय होत होती.
ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले, त्यामुळे डिसेंबरपासून बहुतांशी निर्बंध हटविण्यात आले. मात्र, पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. सामान्य प्रवाशांकडून या गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तसेच वेळ आणि श्रम वाचविणारा व सुखकारक असा रेल्वेचा प्रवास असल्याने, या गाड्यांची मागणी होत होती.
दिवाळीच्या हंगामात दोन पॅसेजर विशेष गाड्या म्हणून सुरू केल्या. आता या पॅसेंजर गाड्यांसह सर्वच गाड्या नियमित तिकिटासह सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तेजस एक्स्प्रेस
- कोकण कन्या एक्स्प्रेस
- तुतारी एक्स्प्रेस
- मांडवी एक्स्प्रेस
- मंगला एक्स्प्रेस
गाड्यांची संख्या वाढणार
- सुमारे दीड वर्ष कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीच्या कमी दरापेक्षा तिप्पट - चाैपट दराने प्रवास करावा लागत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या कमी दरात या गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यासाठी या विशेष गाड्या पूर्वीच्या तिकीट दरात सुरू करण्यात आल्या आहेत. तिकीट कमी असल्याने प्रवासी वाढणार असल्याने गाड्यांची संख्याही वाढेल.
पॅसेंजरची प्रतीक्षा संपली
रत्नागिरी - दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा - मडगाव या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन पॅसेजर गाड्या कोरोना काळात बंद राहिल्या. आता त्या नियमित दराने सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना मुंबई प्रवास परवडणारा आहे.
तिप्पट तिकिटाचा बाेजा हाेणार कमी
रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा स्पेशल दर्जा हटविण्याचा निर्णय घेतला असून गाड्यांना पूर्वीचे क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरक्षण प्रणालीही अद्ययावत केली जात आहे. त्यामुळे तिकीट दर कमी होणार आहेत.
आतापर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीट दरही आता पूर्वीसारखे कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वच प्रवाशांची पॅसेजर गाड्यांसाठी मागणी होती. ती मागणीही आता पूर्ण केली असून या पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करताना पूर्वीच्या तिकिटातच करता येणार आहे.- उपेंद्र शेंड्ये, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक, रत्नागिरी विभाग