रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग, पुलाच्या उभारणीसाठी माती परीक्षण
By मनोज मुळ्ये | Published: June 19, 2023 05:36 PM2023-06-19T17:36:41+5:302023-06-19T17:37:24+5:30
एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार
रत्नागिरी : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग आला असून, काळबादेवी-मिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यातून मातीचा स्तर तपासण्यात येणार आहे. त्यानंतर पूल उभारणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गांतर्गत रस्ता रुंदीकरण, चाैपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, या रस्त्यासाठी १० हजार कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. आठ दिवसांपूर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ४० फूट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजून १०० फूट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भूगर्भातील जमिनीचा स्तर तपासण्यात येणार आहे. काळबादेवी येथे ३, खाडीच्या पाण्यात ३ आणि मिऱ्या येथे किनाऱ्यावर तीन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुने घेण्यात येणार आहेत. हे काम पुढील दोन ते तीन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.