कडक लॉकडाऊनला राजापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:34+5:302021-06-04T04:24:34+5:30
राजापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी १ मे रोजी काढलेल्या कडक लॉकडाऊनच्या ...
राजापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी १ मे रोजी काढलेल्या कडक लॉकडाऊनच्या आदेशाला राजापूर तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला़ शहरात गुरुवारी सकाळपासूनच शहर बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील मेडिकल दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यानी प्रारंभी २ जूनपासून पुढील सात दिवस सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, अर्धवट लॉकडाऊन योग्य नाही. जर फक्त बाजारपेठा बंद करण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात येणार असेल तर त्याला व्यापाऱ्यांचा विरोध राहील, असे जाहीर करत जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी संघटनांनी आपण २ जूनपासून दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी रत्नागिरी व मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांनी ऑनलाइन चर्चा केली.
व्यापाऱ्यांच्या सूचनांचा नवीन आदेशामध्ये समावेश करत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुधारित आदेश काढून दिनांक ३ मे ते ९ मे या कालावधीत संपूर्ण जिल्हाबंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून राजापूर बाजारपेठ व तालुक्यातील अन्य बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. सर्वसामान्य जनतेनेही या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहणे पसंद केले़