क्रीडा अकादमीमुळे खेळाडूंना आकाश मोकळे : अंजली भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 03:47 PM2019-02-15T15:47:14+5:302019-02-15T15:49:23+5:30
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने क्रीडा अकादमी सुरू केल्याने खेळाडूंना आकाश मोकळे आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जावरील सोईसुविधा या अकादमीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचे खेळाडूंनी सोने करा, असा संदेश कॉमनवेल्थ व इशियाड स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेत्या अंजली भागवत यांनी देवरूख येथील कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने क्रीडा अकादमी सुरू केल्याने खेळाडूंना आकाश मोकळे आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जावरील सोईसुविधा या अकादमीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचे खेळाडूंनी सोने करा, असा संदेश कॉमनवेल्थ व इशियाड स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेत्या अंजली भागवत यांनी देवरूख येथील कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
आठल्ये- सप्रे- पित्रे महाविद्यालय संचलित डॉ. सुलभा आपटे क्रीडा अकादमी संकुलाचे उद्घाटन तसेच अकादमीच्या क्रीडांगणाचे नामकरण आॅलिंपिक रौप्य पदक विजेते हॉकीपटू मेजर शांताराम जाधव क्रीडांगण असे करण्याचा समारंभ दिमाखात संपन्न झाला. यावेळी अंजली भागवत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे महनीय कार्य पाहून आपण अचंबित झालो आहोत. डॉ. सुलभा आपटे क्रीडा अकादमी संकुलाचे उद्घाटन आपल्या हातून होत आहे हे आपले भाग्य आहे. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे आज चीज झाल्यासारखे वाटते.
शालेय जीवनात एनसीसीमुळे प्रोत्साहन मिळाले. राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रारंभी प्रथम राष्ट्रगीत वाजवले जाते. यामुळे अंगात एकप्रकारचे स्पीरीट निर्माण होते. स्पर्धांमध्ये मिळालेली मेडल काही क्षणानंतर कपाटात बंद होतात. देशासाठी खेळाताना विविध स्पर्धांमध्ये रसिक प्रेक्षकांनी दिलेले प्रोत्साहन ही आपल्यासाठी मोलाची देणगी ठरली आहे. देवरूख संस्थेने सर्व सोयी सुविधांनी युक्त असे क्रीडा अकादमी सज्ज केली आहे. हे येथील खेळाडूंचे भाग्य आहे.
आपल्या स्वप्नात असलेली क्रीडा अकादमी देवरूखात साकार होत आहे याचा आनंद वाटतो. या अकादमीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील. खेळाडूंनी मात्र मनाची तयारी ठेवा. रायफल शुटींगसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे भागवत यांनी अखेर नमूद केले.
प्रास्ताविक पांडुरंग भिडे यांनी करताना संस्थेच्या कारभाराचा धावता आढावा घेतला. क्रीडा अकादमीसाठी डॉ. रविंद्र्र आपटे यांनी ५० लाख रूपयांची देणगी दिल्याचे नमूद केले. यानंतर बांधकामासाठी मेहनत घेणारे दत्ताराम मुंडेकर, अरविंद पागार, केशव मांडवकर, संतोष खंडागळे यांसह रायफल शुटींग मध्ये चमकदार कामगिरी करणारे पुष्कराज इंगवळे व विशाल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसिध्द उद्योजक संजय कारखानीस यांनी मनोगत व्यक्त करताना देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने दुरदृष्टी ठेवून क्रीडांगणाला महत्व दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच क्रीडा गुण असणे गरजेचे आहे. नोकरीसाठी मुलखात घेताना या गुणांकडे पाहिले जाते. संस्थेने क्रीडा अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी चांगली सुविधा उपलब्ध केली आहे. ही येथील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
संस्थेने एखाद्या खेळाचे पालकत्व आमच्याकडे द्या. हे पालकत्व कंपनीच्या माध्यमातून पुर्णत्वास नेण्यासाठी कटिबध्द असल्याचे कारखानीस यांनी नमूद केले. आपल्या मित्र मंडळींना संस्थेच्या कार्यास हातभार लावण्यासाठी उद्युक्त करू असे सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्लॅस्टिक सर्जन डॉ. रवींद्र्र आपटे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेने क्रीडा अकादमीच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध करून दिले आहे. या अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील. हे खेळाडू भारताचे नाव नक्कीज उज्ज्वल करतील असा विश्वास डॉ. आपटे यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे मानद अध्यक्ष बाळासाहेब जोशी, वीरपत्नी पुष्पलता जाधव, संस्था उपाध्यक्ष मदन मोडक, नेहा जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, प्राचार्य डॉ. नरेंद्र्र तेंडोलकर, देवरूखचे उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, आशा खाडीलकर, माधव खाडीलकर, शिरीष फाटक, संदीप मादुस्कर, कर्नल मधुकर जाधव, कर्नल अशोक दळवी, कर्नल सतीष जाधव उपस्थित होते.
..ते खडतर क्षण
सन १९८८ साली रायफल शुटींगमध्ये आपण झेप घेतली. मात्र त्यावेळी सोयीसुविधांचा अभाव होता. २ रायफल १५ जणांना वापरायला लागत होती. रायफल हातळण्याचा सराव होण्यासाठी वेळप्रसंगी विटा वापरव्या लागत होत्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे अशी मनात दुर्दम्य इच्छाशक्ती होती. अनेक संकटांवर मात केल्यानंतर यश पदरात पडले. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर त्यामध्ये यशस्वीता गाठता येते असे भागवत यांनी सांगितले.