क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:19 PM2023-01-23T19:19:43+5:302023-01-23T19:26:32+5:30
त्या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने चूक कबूलही केली
चिपळूण : एका मोठ्या शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली. पालक आणि महिलांनी शाळेत जाऊन गावठी मराठी भाषेत त्याचा चांगलाच उद्धार केला. शहरात या विषयाची चर्चा होताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाला ‘सोमनाथा’चा यथेच्छ प्रसाद देत त्याची रवानगी थेट पंढरपुरात केली.
कडक शिस्त, तसेच शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने या शाळेचा नावलौकिक आहे. मात्र, याच शाळेत विकृती मनोवृत्तीचा एक शिक्षक गेली काही वर्षे काम करत होता. क्रीडा शिक्षक असल्याचा गैरफायदा घेत त्याने एका १३ वर्षीय विद्यार्थिनीशी लगट करण्याचा, तसेच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी कमालीची घाबरली. तिने मैत्रिणींना हाक मारण्याचा प्रयत्न केला. जवळूनच काही मुली जात होत्या. त्यांनी तेथे जाऊन तिला धीर दिला.
सर्व प्रकार त्या मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचला. पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारला. काही महिलांनीही यावेळी त्या शिक्षकाचा समोरासमोर अस्सल गावठी मराठी भाषेत त्याचा उद्धार केला. नंतर तो शिक्षक गायब झाला होता.
शहरात या विषयाची मोठी चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याची दखल घेत चिपळूणमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाचा शोध घेतला. तो घरात लपून बसला असल्याचे समजताच मनसे कार्यकर्ते थेट त्याच्या घरी पोहचले. यावेळी काही महिलादेखील उपस्थित होत्या. चांगल्या भाषेत त्याला समजावून बरोबर घेतले आणि एका सुरक्षित ठिकाणी आणून यथेच्छ प्रसाद दिला.
त्या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने आपली चूक समोरासमोर कबूलही केली. पुन्हा असे कधी घडणार नाही, असे नमूद करत त्या मुलीची व तिच्या पालकांची माफी मागितली. तसे लेखीही दिले. मनसे पदाधिकारी इतक्यावरच थांबले नाहीत तर यापुढे चिपळुणात थांबायचे नाही, असा सज्जड दम देत स्वतःच्या पंढरपुरात निघून जाण्याचा सल्लाही दिला. या शिक्षकाचे अनेक कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत.
कारवाई का नाही?
इतका प्रकार घडूनही संस्थेने त्याच्यावर कारवाई केलेली नाही. शाळेची बदनामी होईल, म्हणून कारवाई होत नाही की, शिक्षकाला पाठीशी घातले जात आहे, याचा उलगडा अजून झालेला नाही. ज्या शिक्षकामुळे मुली असुरक्षित आहेत, अशा शिक्षकाला नोकरीत का ठेवले, हाच प्रश्न आता लोक करत आहेत.