कोकण रेल्वे मार्गावर फवारणी करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:01+5:302021-05-05T04:51:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची विष्टा पटरीवर पडत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची विष्टा पटरीवर पडत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या मार्गावर मेंटेनन्स इंजिनद्वारे फवारणी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन व आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या गाडीतून जे प्रवासी प्रवास करीत आहेत, त्यांची विष्टा रेल्वे पटरीवर पडत आहे. काही गाड्यांना बायोमेट्रिक सीस्टिम आहे, पण बहुतांशी रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची विष्टा रेल्वे मार्गावर पडत आहे. रेल्वे पटरीच्या लगत काही गावे आहेत. ही विष्टा रेल्वे पटरीवर पडत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव पटरीच्या अगदी लगतच्या गावांमध्ये होण्याची शक्यता आहे. चिपळूणमधील पेढे, वालोपे, कळंबस्ते, खेर्डी, कामथे अशा अनेक गावांमध्ये प्रादुर्भाव वाढू शकतो. या विष्टेमुळे कोरोना किंवा इतर रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या गाव मधून रेल्वेची पटरी जात आहे, त्या वस्तीच्या ठिकाणी कोकण रेल्वेने ताबडतोब फवारणी करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.