औद्याेगिक वसाहतीत काेराेनाचा फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:15+5:302021-05-06T04:33:15+5:30
आवाशी : लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीत जवळपास सर्वच कंपन्यांतून कोरोनाने शिरकाव केला असून, त्याचा फैलाव परिसरात ...
आवाशी : लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीत जवळपास सर्वच कंपन्यांतून कोरोनाने शिरकाव केला असून, त्याचा फैलाव परिसरात वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना महामारीचे संकट गडद होत असून, आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच त्याचा जोरदार प्रसार होत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अकरा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, खेड व चिपळूण तालुक्यांतही त्याने थैमान घातले आहे. खेड व चिपळूण तालुक्यांच्या मध्यावर असणाऱ्या लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीत काम करणारे अनेक कामगार याच दोन तालुक्यांतील आहेत. जोडीला जिल्हा व परजिल्ह्यांसह परप्रांतातील अनेक कामगार याच परिसरातील लोटे, घाणेखुंट, पिरलोटे, धामणदिवी, आवाशी, असगणी व लवेल - दाभिळ याच गावात वास्तव्यास आहेत.
लोटे औद्योगिक वसाहतीत जवळपास वीस हजारांहून अधिक कामगार काम करीत आहेत. यापैकी काही कायमस्वरूपी आहेत, तर अनेक जण ठेकेदारी तत्त्वावर येथे मिळेल ते काम करणारे आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीत उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची कोरोना चाचणी करून प्रत्येक कंपनीने स्वत:चे कोविड सेंटर उभारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक कंपन्यांना जागेअभावी स्वत:चे कोविड सेंटर उभारणे शक्य नसून, आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नाही. त्यामुळे अजूनही अनेक कंपन्या कोविड सेंटरअभावी कामकाज करत आहेत. मात्र, येथील काही नामांकित कंपन्यांनी आपल्या प्रत्येक कामगाराची कोविड चाचणी करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू केले असून, यात अनेक कामगार पॉझिटिव्ह येत असल्याचे समोर येत आहे. मात्र, संबंधित कामगारांना उपचार काय व कोठे मिळत आहेत, याबाबत माहिती उघड केली जात नाही.
कंपनीच्या कायमस्वरूपी कामगारांना काही कंपन्यांतून योग्य प्रकारे सहकार्य मिळत असले तरी ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर कोरोनाची बाधा असणाऱ्या कंपनी कामगाराला कामावर येण्यास मज्जाव करणाऱ्या कंपन्या ठेकेदारीवर काम करणाऱ्यांना कोणतीही सवलत देत नाहीत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची भीती आहे. कंपनीप्रमाणेच त्यांच्या घरच्यांनाही हा धोका आहे. त्यामुळे ठेकेदारीवर काम करणाऱ्यांचीही तपासणी आणि उपचार याकडे कंपन्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.