Ratnagiri: भैरी बुवाच्या भेटीसाठी श्री नवलाई, पावणाई, म्हसोबाच्या पालख्या; भाविकांची मोठी गर्दी
By मेहरून नाकाडे | Published: March 25, 2024 05:06 PM2024-03-25T17:06:23+5:302024-03-25T17:06:40+5:30
रंगपंचमीनंतरच पालखी मंदिरात परतणार
रत्नागिरी : बारा वाड्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी बुवाच्या भेटीसाठी जाकीमिऱ्या व सडामिऱ्या येथील श्री नवलाई, पावणाई, म्हसोबाच्या पालख्या आल्या होत्या. जाकीमिऱ्याची पालखी भैरी भेटीनंतर बाहेर पडत असतानाच सडामिऱ्या येथील पालखीचे आगमन श्री भैरी मंदिराच्या प्रांगणात झाले. मंदिराच्या प्रांगणात काल, रविवारी रात्री ११.३० वाजता दोन्ही पालख्यांची भेट होताच हजारो भाविकांनी एकच गजर केला.
कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिमगोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. श्री भैरी मंदिरात होणारी पालख्यांची भेट पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी होते. यावर्षीही भेट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. अनेक भाविकांनी पालखी भेटीचा सोहळा टिपण्यासाठी कॅमेरे सज्ज ठेवले होते.
सडा मिऱ्या व जाकीमिऱ्या येथील पालख्यांची भेट झालेनंतर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. रंग उधळण्यात आले. फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जाकीमिऱ्या व सडामिऱ्या येथील दोन्ही पालख्या गेल्यानंतर ग्रामदैवत श्री भैरीबुवाची पालखी वाजतगाजत मंदिराबाहेर पडली. मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात मध्यरात्री पर्यंत भाविकांची गर्दी होती. पालखी भेटीचा आनंद भाविकांना अनुभवता यावा यासाठी मंदिराच्या प्रांगणात जागोजागी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.
शिमगोत्सवानिमित्त श्री भैरी मंदिरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करून पताका, फुले लावून सजावट करण्यात आली आहे. बारा वाड्याचे ग्रामदैवत असलेले भैरी बुवा भक्ताच्या भेटीला मंदिराबाहेर पडले आहेत. पालखी मानाच्या ठिकाणी जाणार असून पूजा स्विकारली जाणार आहे. त्यामुळे सध्या शहरात वाद्याच्या गजरात भाविक पालखी नाचविण्याचा आनंद घेण्यात येत आहे. रंगपंचमीनंतरच पालखी मंदिरात परतणार आहे.