बा देवा गणराया, विलीनीकरणाची जबाबदारी घे रे महाराजा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:52 PM2022-02-08T18:52:11+5:302022-02-08T18:52:33+5:30
शासनास आणि प्रशासनास विलीनीकरणाची सद्बुद्धी दे रे महाराजा. या सर्वांची बडतर्फी, निलंबन, सेवासमाप्ती यापासून रक्षण कर.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : ‘हे कष्टकरी एसटी कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहा. या शासनास आणि प्रशासनास विलीनीकरणाची सद्बुद्धी दे रे महाराजा. या सर्वांची बडतर्फी, निलंबन, सेवासमाप्ती यापासून रक्षण कर. विलीनीकरणाची जबाबदारी घे, एसटी कर्मचाऱ्यांना सुखशांती आणि या गरीब जनतेची लालपरी वाचव रे महाराजा’, असे गाऱ्हाणे घालत रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी गणरायालाच साकडे घातले.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण हाेण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ८ नाेव्हेंबरपासून आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत. महामंडळासह प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर हाेण्याची विनंती केली आहे. या विनंतीनंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले असून, काहीजण अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची बससेवा अजूनही काेलमडलेलीच आहे.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांनीच माघी गणेशाेत्सवाचे औचित्य साधत गणरायालाच साकडे घातले आहे. काेकण आणि गणेशाेत्सव हे एक समीकरणच आहे. गणरायाला घातलेले गाऱ्हाणे पावन हाेते अशी धारणा गणेशभक्तांची आहे. गणरायावरील श्रद्धेपाेटी साऱ्या कर्मचाऱ्यांनी गणरायाच्या मंदिरात एकत्र येत विलीनीकरण करण्यासाठी साकडे घातले.
‘आई, बा गजानना’ अशी सुरुवात करत कर्मचाऱ्यांनी देवासमाेर आपली व्यथा मांडली. ‘एसटीचे कष्टकरी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरणासाठी दुखवटा पाळत आहेत. आज या विलीनीकरणासाठी ८८पेक्षा जास्त कर्मचारी शहीद झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, म्हणून हा दुखावटा आहे रे महाराजा.
बा देवा महाराजा, विघ्नविनाशक गणराया, तू सुखकर्ता, दु:खहर्ता आहेस. तुझेच लेकरू डाॅ. बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवून हे एसटी कर्मचारी आणि छत्रपती शिवरायांचे मावळे दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने तू उभा राहा. जे दुखवट्यात आहेत, त्यांच्यासाेबत आणि जे साेडून गेले आहेत त्यांच्याशिवाय हे कष्टकरी एसटी कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहा,’ असे साकडे घातले.