एस.टी. खड्ड्यात, विभागातील पाचशे फेऱ्या अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:56+5:302021-09-07T04:38:56+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एस.टी. सेवा पूर्ववत होत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय फेऱ्या अद्याप बंद आहेत. कमी भारमानामुळे जिल्ह्यातील पाचशे फेऱ्या बंद आहेत. त्यामध्ये खराब रस्त्यामुळे २८ बंद फेऱ्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असून काही भागातून अत्यल्प भारमान लाभत असल्याने पाचशे फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. चिपळुणातील काही फेऱ्या बंद आहेत.
कोल्हापूर मार्गात बदल
रत्नागिरी-कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट दरडी कोसळल्याने धोकादायक झाल्याने हा मार्ग मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन ३२ फेऱ्या सुरू होत्या; परंतु हा मार्ग धोकादायक झाल्याने अणुस्कुरामार्गे सध्या आठ फेऱ्या सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे चिपळुणातील खराब रस्त्यामुळे चार फेऱ्या बंद आहेत.
एसटी खर्च वाढला
n कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली असल्याने अंतर वाढते. पर्यायाने इंधन खर्चात वाढ झाली आहे.
n काही गावातील रस्ते निकृष्ट, साइडपट्टी खराब झाल्याने अपघाताची संख्याही वाढली आहे.
n खराब रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे, पाटा तुटणे, गिअर बाॅक्स निकामी होण्याचे प्रकार वाढल्याने खर्चात भर पडत आहे.
नऊ आगारांतील फेऱ्या बंद
शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारांतील शालेय फेऱ्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय अत्यल्प भारमान असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील नऊ आगारांतील मिळून एकूण पाचशे फेऱ्या बंद आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.
भारमानाचा अंदाज घेत एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. सध्या पाचशे फेऱ्या बंद असल्या तरी प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. बंदमध्ये रात्रवस्तीच्या गाड्यांचा समावेश आहे. कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, अंतरातील व तिकीटदरातील वाढीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. भारमान पाहून फेऱ्या सुरू करण्यात येतील.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक
n शहरी मार्गावर १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
n विभागातील रात्रवस्तीच्या शंभर फेऱ्या बंद आहेत.
n कोल्हापूर मार्गावरील २४ फेऱ्या अद्याप बंदच आहेत.
जिल्ह्यातील आगार आणि सुरू बस संख्या
मंडणगड ३६
दापोली ६९
खेड ६८
चिपळूण ९९
गुहागर ६७
देवरूख ५८
रत्नागिरी ११०
लांजा ५३
राजापूर ५४