एस.टी.तील कर्मचारी उपस्थिती १५ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:54+5:302021-05-09T04:32:54+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ची वाहतूक सुरू ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ची वाहतूक सुरू आहे. पन्नास टक्के प्रवासी भारमानांतर्गत वाहतूक सुरू असली, तरी प्रत्यक्षात ९ ते १० टक्के इतकीच वाहतूक सुरू आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी एस.टी.मध्ये कार्यालयीन तसेच वाहतुकीसाठी १५ टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली असून, त्याचे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे दोन दिवसांआड कार्यालयात यावे लागत आहे. चालक, वाहकांना तर आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच ड्युटी करावी लागत आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना ये-जा करणे सोपे व्हावे, यासाठी एस.टी. वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. एस.टी. प्रवासासाठी ओळखपत्र, आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांनाही येण्याजाण्यासाठी अन्य साधन नसल्याने एस.टी. त प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीला हजेरीसाठी चालक-वाहकांना दररोज यावेच लागत होते. मात्र, आता हजेरी बंद करण्यात आली असून, उपस्थितीबाबतही काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन ते तीनच दिवस कामावर यावे लागत आहे. त्यामुळे एस.टी. कार्यालयातील गर्दी घटली आहे.
हजेरी बंद झाल्यामुळे गर्दी घटली
सुरुवातीला चालक-वाहकांना दररोज हजेरीसाठी कार्यालयात यावे लागत होते. त्याशिवाय चालक-रस्त्यावरील गाड्या, अवैध वाहतूक सुरू असलेल्या वाहनांवर देखरेख करावी लागत होती. प्रशासनाने दोन्ही पद्धती बंद केल्या असून फक्त ड्युटी असेल तेव्हाच यावे लागत आहे. त्यामुळे होणारी गर्दी थांबली आहे.
प्रवासी वाहतूक ५० टक्के असली तरी दैनंदिन वाहतूक अवघी ९ ते १० टक्केच सुरू आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवसच ड्युटी करावी लागत आहे. भारमान कमी आहे, शिवाय महामंडळाच्या निर्णयानुसार १५ टक्के उपस्थिती ठेवावी लागत असल्याने ताण कमी झाला आहे.
- मनाली साळवी (वाहक)
आठवड्यातून दोन ते तीन दिवस ड्युटीसाठी यावे लागते. दैनंदिन हजेरी बंद केल्यामुळे ड्युटीव्यतिरिक्त आगारात येण्याचा त्रास आता कमी झाला आहे. प्रत्यक्ष प्रवासी भारमान कमी आहे. त्यामुळे मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. कोरोनामुळे आरोग्याची काळजी घेत सेवा बजावत आहोत.
- मंगेश चव्हाण (चालक)
महामंडळाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतूक सुरू आहे. कार्यालयीन कामकाजासाठीही १५ टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. फेऱ्या कमी असल्याने रोटेशनप्रमाणे ड्युटी लावली जात आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस ड्युटीसाठी चालक, वाहक, तसेच कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागत आहे. कार्यालयातील गर्दी ओसरली असली, तरी त्याचा कामावर परिणाम होत आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक