एस.टी़.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलंय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:45+5:302021-06-04T04:23:45+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना रुग्णांची ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कडक निर्बंध जारी करण्यात आले. अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी़. सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एस.टी़.तील गर्दी ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यात प्रवासी संख्या घटली, शिवाय फेऱ्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. दीड महिन्यात १९ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा तोटा रत्नागिरी विभागाला सोसावा लागला आहे.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करीत असले तरी, ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने अन्य प्रवाशांना एस.टी.त प्रवेश दिला जात आहे. गतवर्षी एस.टी.त चढलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. आता सॅनिटायझर देणे बंद केले आहे. मात्र वाहकच प्रवाशांना सॅनिटायझर हाताला लावले का? हे विचारत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक असतील तर वाहक स्वत:कडील सॅनिटायझर देत आहेत. शिवाय एका सीटवर एकानेच बसावे, मास्क हनुवटीवर नको तर नाक-तोंड झाकेल असा लावा, असे सांगावे लागते. वास्तविक एस.टी.त अन्य प्रवाशांना नाकारण्यात येत असले तरी, वाडी-वस्तीवरील ज्येष्ठ, वयस्कर मंडळींना पर्यायी साधन नसल्यामुळे एस.टी.त प्रवेश द्यावाच लागत आहे.
गेल्या दीड महिन्यात फेऱ्या घटल्यामुळे एस.टी़.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक भुर्दंड सोसत एस.टी़. प्रवाशांना सेवा देत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक फेरीनंतर एस.टी़.चे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
सर्वाधिक वाहतूक चिपळूण मार्गावर
रत्नागिरी, चिपळूण, पोफळी मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शासकीय, खासगी सेवेतील कर्मचारी, अधिकारी एस.टी़.तून प्रवास करीत आहेत.
देवरूख-रत्नागिरी, रत्नागिरी-लांजा, रत्नागिरी-राजापूर या मार्गावरही प्रवासी संख्या अधिक असल्याने एस.टी.ला चांगले भारमान लाभत आहे. शिवाय अन्य प्रवाशांचीही वर्दळ सातत्याने सुरू असते.
शासनाकडून खासगी वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असल्याने एस.टी.ला चांगले दिवस आले होते. मात्र लाॅकडाऊनमुळे एस.टी़.चे आर्थिक चक्र पुन्हा बिघडले आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना तोटा सोसावा लागत आहे.
ना मास्क, ना सॅनिटायझर...
गतवर्षी एस.टी.त चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. मास्क नसणाऱ्या प्रवाशाला मास्कही दिला जात होता. आता मात्र सॅनिटायझर दिले जात नाही. मास्क हनुवटीला अडकवून एस.टी.त चढणाऱ्या प्रवाशांना जरूर वाहकांकडून हटकले जाते.
१९ कोटीचा ताेटा
प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने गेल्या दीड महिन्यात रत्नागिरी विभागाला १९ कोटी सात लाख ५० हजाराचा तोटा सोसावा लागला आहे. लाॅकडाऊन संपेपर्यंत आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागेल.
प्रवासी घरातच
‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक संचारबंदीमुळे अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई होत असल्याने, नागरिक घराबाहेर पडणेच टाळू लागल्याने एस.टी.चे प्रवासी सध्या घरातच आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू ठेवण्यात आली असली तरी, भारमानाअभावी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे बिघडलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा झटका बसला. प्रवाशांच्या बेफिकिरीमुळे एस.टी.चे कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे एस.टी.त प्रवेश देताना सॅनिटायझर लावा, मास्क नीट लावा, एका सीटवर एकानेच बसा अशा सूचना वारंवार द्याव्या लागत आहेत. आठवडाभराचे कडक लाॅकडाऊन असल्याने आणखी झळ सोसावी लागणार आहे.
- मनाली साळवी, वाहक
प्रवासी सेवेसाठी कार्यरत असलेल्या एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कडक संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू असली तरी, त्यातून मिळणारे उत्पन्न जेमतेम आहे. बुडत्या एस.टी.ला सध्या तरी मालवाहतुकीचा एकमेव आधार आहे. त्यामुळे महामंडळाने एस.टी. स्वावलंबी होऊन उत्पन्न मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. गतवर्षीपासून एस.टी.चे उत्पन्न खालावत आहे. ते सुधारण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अन्यथा तोटा वाढणारच आहे.
- मंगेश देसाई, चालक