ST Strike : ..तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:17 PM2021-11-14T12:17:05+5:302021-11-14T12:19:56+5:30
रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला ...
रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नाही. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल, शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून यावर तोडगा निघालेला नाही. परिणामी एसटी सेवा अजून देखील बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर, दुसरीकडे खासगी वाहतूक तेजीत सुरु आहे.
दरम्यान, रत्नागिरी येथील आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचार्यांनी आज, रविवारी सकाळी जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
तर, सरकारकडून आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान शासनाने आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांवर राज्यात अनेक ठिकाणी निलंबनाची कारवाई देखली केली आहे. तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यातच काल, शनिवारी कोल्हापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईच्या भितीने ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यावर कधी तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.