कर्मचाऱ्यांची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:37+5:302021-06-11T04:21:37+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्यानुसार बहुतांशी गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. ...
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्यानुसार बहुतांशी गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत रेल्वे मार्गावर कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी ६८१ कर्मचारी अहोरात्र गस्त देणार आहेत.
शेतकरी समाधानी
खेड : या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १० जूनच्या अमावास्येनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून काहींनी शेतीची फोड, बेर यासारखी मशागतीची कामेही सुरू केली आहेत. सध्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
५० हजार रोपांची वाटिका
आवाशी : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रूक गावडेवाडी येथील दीपाली रेणोसे या महिलेने नर्सरीमध्ये ५० हजार रोपे तयार केली आहेत. ऑक्सिजन देणारी रोपे तयार करणाऱ्या या महिलेने गावातील १० महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. या उपक्रमाबद्दल दीपाली रेणोसे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशासनाच्या नोटिसा
रत्नागिरी : जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ३१ गावे पूरग्रस्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तसेच ४५ दरडग्रस्त गावे म्हणूनही घोषित करण्यात आली आहेत. हवामान खात्याने सध्या मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या अनुषंगाने या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
ग्रामस्थांना लसीकरण
दापोली : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वांझळोली आमखोलवाडी येथे ग्रामपंचायतीने २०४ ग्रामस्थांना एकाच दिवशी लस देऊन बाजी मारली आहे. वांझळोली गाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन सरपंच नितीन दुर्गवळे यांनी गावात लसीकरण मोहीम राबविली.
घराचे नुकसान
रत्नागिरी : शहरानजीकच्या किल्ला तळेकरवाडी येथे अमेय साळवी यांच्या घरावर जुनाट झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या सहकार्याने हे झाड उशिरापर्यंत दूर करण्याचे काम सुरू होते. झाड कोसळल्याने कौले, लाकडी रीपांचे नुकसान झाले आहे.
रोपवाटिका प्रात्यक्षिक
दापोली : विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोकणामध्ये महामार्गानजीकच्या गावांमध्ये भातपीक प्रात्यक्षिके आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून खेड तालुक्यातील उधळे येथील गादीवाफा रोपवाटिका यावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
कोविड केंद्रांना साहाय्य
राजापूर : कोरोनाच्या लढ्यासाठी आता विविध संस्थांकडून सहकार्य मिळू लागले आहे. येथील इमेन्स फाउंडेशन या संस्थेकडून तालुक्यातील धारतळे आणि रायपाटण या कोविड सेंटरला किराणा साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पहिल्या लाटेतही या संस्थेने भरीव मदत केली होती.
भरमसाट वृक्षतोड
खेड : लॉकडाऊनचा गैरफायदा घेत तालुक्यातील मोहाने येथे विविध वृक्षांची भरमसाट कत्तल करण्यात आली आहे. ही झाडे तोडून रस्त्यालगतच साठा करून ठेवण्यात आली आहेत. डोंंगर उतारावरील झाडे तोडल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात या मार्गावर दरड कोसळण्याचा धोका व्यक्त होत आहे.
रस्त्या जलमय
दापोली : तालुक्यातील केळशी येथील उटंबरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साठल्याने पादचारी आणि वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर असलेले गटार कित्येक वर्षे बुजलेले आहे. त्यामुळे पाणी साचत आहे.