गाडी ओढत पोलीस अधीक्षकांना दिला कर्मचाऱ्यांनी निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 03:05 PM2020-09-21T15:05:02+5:302020-09-21T15:06:09+5:30
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व अधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांचे हे प्रेम पाहून डॉ. मुंढेही गहिवरले. असा निरोप समारंभ न पाहिल्याचे ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षात रत्नागिरीकरांनी आपल्या प्रत्येक कामात चांगला प्रतिसाद दिला. कोणत्याही संकट काळात रत्नागिरीकर पोलिसांच्या बरोबर उभे राहिले. त्यामुळे याठिकाणी २ वर्षे कधी पूर्ण झाली कळले नाही, असे भावोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.
डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली असून, रविवारी येथील पोलीस मुख्यालय बहुउद्देशीय हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ. मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रवीण पाटील, पोलीस उपअधीक्षक आयुब खान, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, लक्ष्मण खाडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डॉ. मुंढे पुढे म्हणाले की, दोन वर्षांच्या कारकीर्दीत जे काही पोलीस दल आणि रत्नागिरीकरांसाठी सामाजिक बांधिलकीतून करणे शक्य होते, ते प्रामाणिपणे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या संपूर्ण टीमने मला पूर्ण साथ दिली, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस दलातर्फेही अनेकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी पाटील यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आभार मानले.