संकटावर मात करण्यासाठी हिमतीने उभे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:39+5:302021-06-10T04:21:39+5:30

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच ...

Stand up with courage to overcome adversity | संकटावर मात करण्यासाठी हिमतीने उभे राहा

संकटावर मात करण्यासाठी हिमतीने उभे राहा

Next

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच पातळ्यांवर कोरोनाने सर्वांचीच अग्निपरीक्षा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या सर्व पातळ्यांवर आपण किती यशस्वी झालो, याचा सर्वस्तरावर विचार होणे आवश्यक आहे. कारण गेल्या सव्वा वर्षात आपण सर्वचजण लॉकडाऊनमध्ये जगत आहोत. हे सर्व करत असतानाच आपले प्रमुख उद्दिष्ट कोरोनाला रोखणे हेच आहे. कोरोनाने धुमाकूळ घातलेला असल्याने त्याचा फटका सर्वच उद्योग-व्यवसायांना बसला आहे.

ठराविक व्यवसाय सुरु असतानाच मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय बंद पडलेे आहेत. जे व्यवसाय सुरु आहेत त्यांना ठराविक वेळेतच सुरु ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनीही कोरोना नियमांचे पालन करुनच आपला व्यवसाय सुरु ठेवायचा असल्याने व्यावसायिकांना ते त्रासदायक ठरत आहे. मात्र, सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरलेले आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट कोसळलेले असतानाच महागाईचा आगडोंबही उसळला आहे. त्यामुळे नोकऱ्या, रोजगार गेलेला असतानाच कोरोनाव्यतिरिक्त महागाईचे मोठे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आणखी किती संकटांना तोंड देणार, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. कोरोनाने रोजगार नेला, तर महागाईने खाण्याचेही वांदे झाले आहेत, अशी बिकट अवस्था झाली असून, जगायचं कसं, या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने या महामारीमध्ये जगण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, ही धडपड सुरु असतानाच महामारीतून वाचलो तर जगणार आहे आणि जगण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तो सोडवायचा कसा, अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे एकीकडे दरी तर दुसरीकडे ओढा, त्यामुळे पाय कुठे टाकणार, अशा परिस्थितीमध्ये लाेक जगत आहेत. मात्र, मोलमजुरीही करता येत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, दोनवेळचे जेवणही मिळत नसेल तर एकवेळचा घास पोटात घालण्यासाठी काम कुठे करणार, सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्याने काम कोण देणार, कामही मिळेनासं झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करुनही हात रिकामेच आहेत, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले असून, सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ते कोणासमोर हात पसरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

आर्थिक व्यवसाय थांबल्यामुळे त्याचे दुष्परिणाम मनुष्यबळावर झाले आहेत. कोरोनामुळे जगंच आर्थिक संकटात सापडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले असले तरी भविष्यात आणखी किती जणांवर नोकरी गमावण्याची आणि किती जणांचे रोजगार बुडणार आहेत, अशी धडकी भरवणारी भीती अनेकांच्या मनात भरली आहे. त्यामुळे आज नोकरी, रोजगार असला तरी येणाऱ्या काळात तो राहिलच, असे नाही. त्यामुळे आहे ती नोकरी, रोजगार टिकवण्यावरच बहुतांश लोक भर देत आहेत. नोकरी, रोजगार नसला तर कुटुंबांचे पालनपोषण कसे करणार, ही भीती प्रत्येकाच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना उद्ध्वस्त केले असले तरी आणखी कितीजणांना उद्ध्वस्त करणार आहे, असा विचार करण्याची वेळ आली असली, तरी प्रत्येकाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हिमतीने, जिकरीने उभे राहण्याची गरज आहे.

Web Title: Stand up with courage to overcome adversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.