साहित्याचा प्रश्न तारांकित मांडावा
By admin | Published: March 9, 2015 09:32 PM2015-03-09T21:32:49+5:302015-03-09T23:55:11+5:30
बच्चू कडू : अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहते, याचा विचार हवा
रत्नागिरी : शासनाकडून अपंगांसाठी असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांना कोणते साहित्य दिले जाते, असा तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित व्हायला हवा, अशी मागणी आज (सोमवारी) झालेल्या अपंगांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात करण्यात आली.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन व संलग्न रत्नागिरी जिल्हा अपंग सहाय व पुनर्वसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेनजीकच्या मराठा मंडळ सभागृहात अपंगांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक, अचलपूर विधानसभेचे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आंदोलनाचे पदाधिकारी रामदास माचे, धमेंद्र सातव (पुणे), सुरेखा सूर्यवंशी, रत्नागिरी जिल्हा अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, एस. जिल्हा परिषद अपंग सहायता केंद्राचे एस. एस. कांबळे, कनिष्ठ सहायक स्नेहल पाटील, आस्था फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे-जोशी, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा आंबेरकर आदी उपस्थित होते.बच्चू कडू यांनी अपंग व्यक्ती दुर्लक्षित का राहाते, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाने अपंगांबाबतचा उदासीन दृष्टीकोन झटकावा आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी सांगितले.
बच्चू कडू हे गली सात आठ वर्षे अपंगांसाठी तळमळीने काम करीत असल्याबद्दल विजय कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आता अपंगांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अपंगांना साहित्य दिले जाते. मात्र, ते साहित्य देताना त्याला त्याचा उपयोग होईल का, याचा विचार करून दिले जात नाही. अपंगानां साहित्य देताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दिले जावे, असा मुद्दा सुरेखा पाथरे यांनी मांडला. (प्रतिनिधी)