जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेचा शांततेत प्रारंभ
By admin | Published: March 3, 2015 09:23 PM2015-03-03T21:23:19+5:302015-03-03T22:17:29+5:30
शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार यावर्षीपासून प्रथमच साडे दहाला विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षचा आजपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळातून ४१,५५५ विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.दहावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे २७,९७७ विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३,५७८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षा संचलन सुनियोजित पद्धतीने पार पडावे, यासाठी दोन्ही जिल्ह्यात २१ परीरक्षक कार्यालये, तर १०३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १३ परीरक्षक केंद्र व ६४ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ परीरक्षक केंद्र व ३९ परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय परीक्षा केंद्रामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४ केंद्र, चिपळूण तालुक्यात ११, खेडमध्ये ९, गुहागरात ५, दापोलीत ७, लांजा तालुक्यात २, संगमेश्वरमध्ये ७, राजापुरात ६ तर मंडणगड तालुक्यात ३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात ६ केंद्र, मालवणमध्ये ५, वेंगुर्ला तालुक्यात ३, सावंतवाडीत ७, कुडाळ तालुक्यात ७, कणकवलीत ७, दोडामार्ग तालुक्यात २, तर वैभववाडी तालुक्यात २ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. अशा पद्धतीने दोन्ही जिल्ह्यात एकूण १०३ परीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.
दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून एकूण १४ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच ५ मंडळ सदस्यांची केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण मंडळाकडून प्रत्येक पथकाला गोपनीय नियोजन करुन देण्यात आले आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार यावर्षीपासून प्रथमच साडे दहाला विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले. परीक्षेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला. साडेदहाला वर्गात जायचे असल्याने १० वाजेपासून परीक्षा केंद्रावर पालक, विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच वर्गात सोडण्यात येत होते. पहिलाच मराठीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण दिसून येत होता. मात्र पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी आनंदात बाहेर पडले, तेव्हा पेपर सोपा गेल्याचे चेहऱ्यावरून दिसून येत होते. (प्रतिनिधी)