महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:50 PM2022-09-17T16:50:24+5:302022-09-17T16:51:16+5:30
ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला.
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मानेचा पट्टा लावूनच प्रवास करायला हवा. उद्योगमंत्र्यांना सुचवावेसे वाटते की, अन्य उद्योग सुरू करण्यापेक्षा महामार्गावर हाड वैद्य, लेप वैद्य व मानेचा पट्टा विकणाऱ्यांचा नवा उद्योग सुरू करावा, असा सल्ला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिपळुणातील सभेत दिला.
शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या शिव संवाद निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांची चिपळुणातील ओझरवाडी येथील शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी, आमदार वैभव नाईक, ॲड. अनिल परब, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, कोकणातील महामार्गाची परिस्थिती वर्षानुवर्षे कायम असून, ती आता बदलली पाहिजे. ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. महिलांसाठी वेगवेगळे आपण काही गोष्टी आणत होतो. गेल्या अडीच वर्षांमध्ये साधारण साडेसहा लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे. मीही शिवसेनेतून एकटा राजीनामा देतो आणि वरळीतून पुन्हा विजय मिळवून दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा उल्लेख न करताच त्यांच्यावर टीका करताना म्हणाले, हॅपकिन हा मोठा वैज्ञानिक होता. त्यांच्या नावाने मोठी संस्था आहे. परंतु, आपल्या आरोग्यमंत्र्यांना तो दलाल वाटतो. नशीब त्यांना खेकडा वाटला नाही. नाहीतर खेकडा वाटला असता तर इथल्या धरणावर आले असते. इथल्या धरणाची अजून खोलवर चौकशी केली असती तर खेकडेच काय आणखी काय काय बाहेर आले असते, असा टोलाही लगावला.