कोकण रेल्वेतील पहिल्या ट्रॅव्हलेटरचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 11:33 PM2016-01-25T23:33:54+5:302016-01-25T23:33:54+5:30
बी. बी. निकम : भारतीय रेल्वेतील दुसरा पदपथ रत्नागिरीत
रत्नागिरी : देशातील रेल्वे विभागात दुसऱ्या व कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या सरकत्या पदपथाचे (ट्रॅव्हलेटर)चे उद्घाटन आज (सोमवार) दुपारी १२.२५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्यातील वास्को येथून रिमोटद्वारे रत्नागिरी स्थानकातील या ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन केल्याची घोषणा रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक बी. बी. निकम यांनी केली.
त्याआधी दुपारी १२.१५ वाजता रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, निकम यांनी उद्घाटनानिमित्त नारळ वाढवला व पदपथाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष मयेकर यांनी सरकत्या पदपथाची फीत कापून औपचारिक उद्घाटन केले. यानंतर काही क्षणातच वास्को येथून मंत्री प्रभू यांनी रिमोटद्वारे सरकत्या पदपथाचे उद्घाटन केले.
उद्घाटनानंतर या सरकत्या पदपथावरून (ट्रॅव्हलेटर) व्यवस्थापक निकम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, उमेश कुळकर्णी, प्रताप सावंतदेसाई, रेल्वेचे अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी प्रवास केला. यावेळी स्थानकावरील प्रवाशांनी सरकता पदपथ पाहण्यासाठी गर्दी केली होती.
सरकत्या पदपथाच्या प्रारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक निकम म्हणाले, अशा प्रकारचे सरकते पदपथ अर्थात ट्रॅव्हलेटर विमानतळांवर उभारले जातात. मात्र, रेल्वेच्या इतिहासात विमानतळाप्रमाणे असा पहिला पदपथ भारतीय रेल्वेत गोरखपूर येथे बसविण्यात आला आहे. रत्नागिरीतील पदपथ हा भारतीय रेल्वेतील दुसरा, तर कोकण रेल्वे मार्गावरील पहिला ठरला आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा निर्माण करून दिली आहे. या विभागातील अनेक स्थानकांवर सरकते जिने (एस्कलेटर) बसविले जाणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी गेल्या वर्षभरात अनेक सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
बीएसएनएलने मागितले ११ लाख ?
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकातील ट्रॅव्हलेटरचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यासाठी आवश्यक जोडणी देण्यास बीएसएनलकडून ११ लाखांची मागणी करण्यात आली. त्यामुळे एक कोटीच्या ट्रॅव्हलेटरला ११ लाखांची ‘फोडणी’ देण्यास कोकण रेल्वे प्रशासनानेही चक्क नकार दिला. परिणामी ट्रॅव्हलेटर उद्घाटनासाठी कोकण रेल्वेने आपले ‘खास’ तंत्रज्ञान वापरून ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन केले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गोव्यातील वास्को येथून रिमोटद्वारे ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन करणार असल्याचे कोकण रेल्वेने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. बी. निकम, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे पदाधिकारी तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्यक्षात १२.२५ वाजता रत्नागिरी स्थानकात बटण दाबून ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनाबाबतच्या काही व्हिडिओ क्लीपस आदल्या दिवशीच तयार करून वास्कोला पाठवण्यात आल्याची चर्चा होती. या ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन कोकण रेल्वेने खास शक्कल लढवून केले. गेल्या महिनाभरापूर्वीपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला ट्रॅव्हलेटर प्रवाशांसाठी उपलब्ध केला, याबद्दल प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
२९ मीटर लांबीच्या व एक मीटर रुंदीच्या या सरकत्या पदपथासाठी (ट्रॅव्हलेटर) १ कोटी रुपये खर्च आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्य व्यस्ततेमुळे त्यांना रत्नागिरीत येणे शक्य नव्हते. मात्र, ते गोव्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी वास्को येथून रिमोटने प्रभू यांच्या हस्ते रत्नागिरीतील ट्रॅव्हलेटरचे उद्घाटन करण्याचे ठरवण्यात आले. रिमोट यंत्रणेसाठीच्या जोडणीबाबत बीएसएनएलला विचारण्यात आल्यानंतर काही मिनिटांसाठी तब्बल ११ लाख रुपये शुल्क मागितल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आहे. कोकण रेल्वे हा बी. एस. एन. एल.प्रमाणेच सार्वजनिक प्रकल्प आहे. त्यात या खात्याकडून अतिरिक्त शुल्क मागून अडवणूक करण्यात आली असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल, अशीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)