फूटब्रीज उभारणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:42+5:302021-08-20T04:36:42+5:30
देवरुख : निवधे बावनदीवर फूटब्रीज उभारणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ग्रामस्थांना लोखंडी साकवावरुन ये-जा करावी लागत होती. परंतु महापुरामुळे ...
देवरुख : निवधे बावनदीवर फूटब्रीज उभारणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ग्रामस्थांना लोखंडी साकवावरुन ये-जा करावी लागत होती. परंतु महापुरामुळे हा साकव वाहून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या गैरसोयीची दखल घेत अखेर बांधकाम विभागाने येथील फूटब्रीज उभारणीला प्रारंभ केला आहे.
मार्ग धोकादायक
राजापूर : ओणी अणुस्कुरा मार्गावर अनेक ठिकाणी झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे हे भाग अपघातप्रवण बनले आहेत. त्यातच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
लसीकरणापासून वंचित
लांजा : तालुक्यात कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत. सध्या तालुक्याला अल्प प्रमाणात डोस दिले जात आहेत. मात्र त्यासाठी नागरिकांना तासन् तास रखडावे लागत आहे.
मोफत आरोग्य तपासणी
सावर्डे : महाराष्ट्र असोसिएशन ऑफ डॉक्टर्स ॲण्ड स्टुडन्टस् (मास) या संघटनेच्यावतीने चिपळूण शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांनाही डॉक्टर संघटनेतर्फे कीट देण्यात आले.
बाजार समित्यांचे बळकटीकरण
रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी प्रस्तावित आराखडा देण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधा याबाबत यात समावेश करण्यात आला आहे.