राजापूर पाेस्ट कार्यालयात रेल्वे बुकिंग सुविधा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:09+5:302021-04-27T04:32:09+5:30
राजापूर : मागील काही वर्षे सातत्याने मागणी होत असतानाही राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे बुकिंग सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे ...
राजापूर : मागील काही वर्षे सातत्याने मागणी होत असतानाही राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे बुकिंग सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुकावासीयांची मोठी गैरसोय होत असून, लवकरात लवकर ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुका वगळता उर्वरित तालुक्यातील पोस्ट कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा यापूर्वीच प्राप्त झाली आहे; मात्र राजापूर तालुक्यातील प्रवासी मात्र या सुविधांपासून वंचित राहिले होते. राजापूर स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी नेटवरुन आरक्षण करीत असतात; मात्र हे स्थानक तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून सुमारे २० ते २२ किलाेमीटर अंतरावर असल्याने त्या स्थानकात जाऊन आरक्षण करणे रेल्वे प्रवाशांना अवघड बनले होते. यापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अन्य तालुक्यातील पोस्ट कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात आली होती. त्याचा फायदा त्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना होत होता. राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा सुरु व्हावी म्हणून राजापुरातून सातत्याने प्रयत्न झाले होते.
यापूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापासून पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाने आश्वासनांखेरीज अजिबात दाद दिलेली नाही. दरम्यान, टेलिकॉम समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या संतोष गांगण यांनी राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना तरी यश येऊदे, अशी अपेक्षा तालुकावासीयांतून व्यक्त होत आहे.