ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोविडमुक्त वातावरणात सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:25+5:302021-06-18T04:22:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : मंडणगड ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोविड रुग्णालय इमारतीतच सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी पाठ फिरवली आहे़ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : मंडणगड ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोविड रुग्णालय इमारतीतच सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी पाठ फिरवली आहे़ रुग्णाची तपासणी कोविडमुक्त वातावरणात व्हावी, अशी मागणी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
मंडणगड तालुक्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर याठिकाणची नियमित आजारांवरील ओपीडी बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असे सांगण्यात आले. मात्र, यामुळे नागरिकांची गैरसोय आणि उपचार मिळण्यास विलंब होऊ लागला. खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या तालुका आढावा बैठकीत यावर चर्चा होऊन खासदारांनी ओपीडी अन्य उपलब्ध जागेत सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले हाेते. तरीही ओपीडी कोविड रुग्णालयाच्या इमारतीतच सुरू करण्यात आली आहे. तसेच याच ठिकाणी कोविड तपासणी करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र ओपीडी संख्या पाहिल्यानंतर स्पष्ट होते. नागरिकांना कोविडमुक्त वातावरण उपचार मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, माजी सभापती भाई पोस्टुरे, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, युवा नेते राकेश साळुंखे उपस्थित होते.
----------------------------
मंडणगड ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी काेविडमुक्त वातावरणात सुरू करण्यासाठी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण उपस्थित हाेते.