जिल्हा रूग्णालयातील विश्रांतीगृहाचे काम सुरु करा : अनिल परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:26 PM2020-01-21T13:26:42+5:302020-01-21T13:27:49+5:30
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले.
रत्नागिरी : रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले.
पालकमंत्री झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांनी सोमवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमन राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे उपस्थित होते समवेत होते.
छोट्या छोट्या कारणांवरुन रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. रुग्णालय हा जिल्ह्याचा आत्मा असतो. या भूमिकेतून सुविधा दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
रुग्णालय स्वच्छतेबाबत मिळालेल्या तक्रारींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या भेटीत त्यांनी आंतररुग्ण विभाग, आयसोलेशन वॉर्ड आणि डायलिसीस विभाग यांच्यासह अनेक विभागांना भेट देऊन पाहणी केली.
स्थानिक स्तरावर दुरुस्ती व इतर कामे यासाठी नियोजन निधीतून पैसे देण्यात येतील असे सांगून ते म्हणाले की, रिक्त पदांची समस्या तसेच औषध खरेदीसाठी कमी पडणारा निधी आदि बाबींसाठी मुंबईत अधिकाऱ्यांची तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊ आणि बैठकीतून समस्या सोडवू असेही, ते म्हणाले. याबाबत १० दिवसात आपणास अवगत करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल बोल्डे यांनी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रुग्णालयाच्या गरजा आणि समस्या यांचीही माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.