कार्यशाळेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:55+5:302021-06-24T04:21:55+5:30
लांजा : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व एक्यूएसी विभागातर्फे ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ या तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन ...
लांजा : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व एक्यूएसी विभागातर्फे ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ या तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेला प्रारंभ झाला आहे. दि. २४ जूनपर्यंत कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्राची लोकधारा, शाहिरांची दिव्य परंपरा व लोककलाकारांचा इतिहास यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
नाैकांची दुरुस्ती सुरू
रत्नागिरी : पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जिल्ह्यातील अडीच हजार मच्छिमार नाैका समुद्रकिनाऱ्यावर विसावल्या आहेत. आता मच्छिमारांनी देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जाळ्या दुरुस्ती, इंजिन दुरुस्ती, रंगकाम, आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पेढे येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आमदार भास्कर जाधव व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे यांनी विशेष पुढाकार घेतला.
वायरमनची मागणी
चिपळूण : शहरानजीकच्या मिरजोळी गावाला वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेजारील गावातील वायरमनला बोलवावे लागत आहे. तातडीने गावासाठी वायरमन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
भात लागवड
पावस : खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तालुक्यातील पावसमध्ये कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विविध कृषी विषयक कार्यक्रम राबविण्यात आले. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कृषी सप्ताहाचे आयोजन केले असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रत्येक प्रभागात लसीकरण
खेड : खेड नगर परिषदेच्या दवाखान्यात सहजीवन हायस्कूलच्या केंद्रावर कोविड लस घेण्यासाठी नागरिकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक प्रभागात लसीकरण करण्याचा निर्णय नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
कोकण विकास समितीची मागणी
खेड : विविध प्रश्नांबाबत कोकण विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश कदम, भरत गोगावले, आमदार मकरंद पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. विविध प्रश्नांचे निवेदन सादर केले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन तीनही आमदारांनी शिष्टमंडळाला दिले.
मोफत जलनेती अभियान
खेड : योग विद्या गुरकुल, नाशिक व पारस उद्योग समूह, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जलनेती अभियान दि. १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत पोलीस, शिक्षक, विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व सहकारी सोसायट्या येथे एक हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
किनरे भगिनींचा सत्कार
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे योगा शिक्षिका व आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या किनरे भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका मानसी करमरकर, प्राजक्ता रूमडे, मधुरा पाटणकर, आदी उपस्थित होते.