भैरीबुवाच्या शिमगोत्सवास २३पासून प्रारंभ
By Admin | Published: March 16, 2016 08:25 AM2016-03-16T08:25:32+5:302016-03-16T08:29:48+5:30
रत्नागिरीचे ग्रामदैवत : मानकरी, गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्सवाची रूपरेषा तयार...
रत्नागिरी : येथील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानचा शिमगोत्सव २३पासून साजरा करण्यात येणार आहे. देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, गावकरी, गुरव यांच्या सहकार्याने शिमगोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
फाल्गुन पौर्णिमेला दिनांक २३ रोजी रात्री १० वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून श्री देव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी सर्व मंडळी पारंपरिक पद्धतीने झाडगाव सहाणेवरून महालक्ष्मी शेतातून भैरी मंदिरात जाणार आहेत. मध्यरात्री १२ वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरीच्या भेटीसाठी बाहेर पडेल. मध्यरात्री १.३० वाजता जोगेश्वरी मंदिरात पोहोचणार आहे. दिनांक २४ रोजी श्री देवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाड्यातील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडेल. झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे पहाटे ५ वाजता मांडवी, भडंग नाका येथे जाईल. तेथून मांडवी घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार मागील समुद्रमार्गाने जाऊन पुढे शेट्ये यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. त्यानंतर तेलीआळी येथून रामनाका, राममंदिर, राधाकृ ष्ण नाका, गोखले नाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भुवन येथे होळी घेण्यासाठी येर्ईल. कुष्टे कंपाऊंड येथे होळी घेऊन दुपारी ३ वाजता झाडगाव येथे सहाणेवर येऊन होळी उभी करण्यात येईल.
दिनांक २४ रोजी रात्री ९ वाजता धुळवडीला प्रारंभ होईल. परंपरेने धुळवड मार्गस्थ होत दिनांक २५ रोजी झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर कंपाऊंडमध्ये दुपारी १२ वाजता येईल. दिनांक २४ ते २८ पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत श्री भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर दर्शनासाठी स्थानापन्न राहणार आहे. दिनांक २५ ते २७ रोजी दररोज रात्री १० वाजल्यानंतर प्रत्येक वाडीतर्फे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे.
२७ रोजी दुपारी १.३० वाजता पालखी मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी जाणार आहे. झाडगाव जोगेश्वरी मंदिर, खालची आळी भैरी मंदिरमार्गे मुरुगवाड्यातून पंधरा माडापर्यंत जाऊन परत मागे फिरणार आहे. रात्री ८.३० वाजता पुन्हा सहाणेवर झाडगावात येईल. २८ रोजी रंगपंचमी खेळण्यासाठी पालखी दुपारी १ वाजता सहाणेवरून उठेल. पोलिसांची शस्त्र सलामी घेऊन झाडगाव श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ येथे ३.३० वाजता येईल. नवलाई पावणाई मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता पोहोचेल. तेथून शहर पोलीस स्टेशन धनजीनाक्यावरून राधाकृ ष्ण नाका, रामनाका, राममंदिर, मारुती आळी, गोखले नाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँगे्रस भुवन, मुरलीधर मंदीर, श्री देव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री ११.३० वाजेपर्यंत येईल. रात्री १२ वाजता पालखी मंदिरात स्थानापन्न होईल. धुपारत व बारा वाड्यांचे गाऱ्हाणे झाल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)