तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास प्रारंभ, इतर दाखल्यांसाठी कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:18 PM2017-11-30T16:18:07+5:302017-11-30T16:24:49+5:30
दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.
रत्नागिरी : दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे तलाठ्यांनी मान्य केले आहे. हे दाखले देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, अन्य दाखल्यांअभावी ग्रामीण भागातील जनतेची कामे ठप्पच झाली आहेत.
राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २ आॅक्टोबरपासून ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी, उत्पन्न, रहिवास, दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदींसह अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले मिळण्यासाठी संबंधित तलाठ्याच्या दाखल्याची आवश्यकता भासते. मात्र, तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनीही काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.
अखेरीस महिनाभराच्या असहकारानंतर तलाठी संघटनेने नागरिकांची समस्या लक्षात घेत उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास सुरुवात झाली.
ग्रामीण जनतेमध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, याचबरोबरीने अन्य दाखले देण्याचे काम कधी सुरु होणार, असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे.
तलाठी संघटनेकडून देण्यात येणारे दाखले विविध शासकीय योजनांसाठी, शैक्षणिक कामासाठी तसेच वैद्यकीय कामासाठी वापरली जातात. मात्र, जनतेला आवश्यक असणारे दाखलेच तलाठी संघटनेने देण्याचे बंद केले आहे.
अन्य दाखल्यांसाठी नागरिक तलाठ्यांकडे खेपा मारत असून, आंदोलनामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.