बँक्स असोसिएशनचे राज्य अधिवेशन
By admin | Published: February 6, 2017 12:41 AM2017-02-06T00:41:38+5:302017-02-06T00:41:38+5:30
विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; विविध विषयांवर चर्चा
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी दि महाराष्ट्र एम्प्लॉईज बँक्स को-आॅप. असोसिएशन लि., मुंबईचे १७वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले.
या दोनदिवसीय अधिवेशनासाठी राज्यातील २६ पगारदार बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, संचालिका, तज्ज्ञ संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन गणपतीपुळचे सरपंच महेश ठावरे व मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या अधिवेशनामध्ये ८ नोव्हेंबरच्या निश्चलीकरणानंतर बँकांना रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या धोरणानुसार ज्या काही समस्यांना सामोरे जावे लागले व त्यानुषंगाने आगामी काळात पगारदार बँकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या याबाबत चर्चासत्र घेण्यात आले.
तर ५ फेब्रुवारी रोजीच्या दुसऱ्या सत्राला सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, महाराष्ट्र स्टेट को - आॅप. कॅश्यू प्रोसेसिंग फेडरेशन लि.,चे अध्यक्ष धनंजय यादव, अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. यावेळी आगामी काळात सहकार क्षेत्राला सरकारकडून बँकांबाबत कसा सकारात्मक दृृष्टीकोन राहिल, याबाबत सतीश मराठे यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील विविध तांत्रिक व वैधानिक स्वरुपातील समस्यांवर समिती नेमून सहकार क्षेत्राच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच पगारदार बँकांना भरावा लागणारा दुहेरी कर भरावा लागू नये, याबाबतही प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.
त्यानंतर स्मरणिका प्रकाशन सोहळा झाला. या अधिवेशनात राज्यातील विविध बँकांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यकारिणीचे माजी संचालक तुळशीराम चौधरी हे अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यटक निवास व्यवस्थापक सुधाकर आवटे, तरंग उपाहारगृहाचे शंकर शेट्टी आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय आगटे, कार्याध्यक्ष तुषार होर्लेकर, सचिव सुरेश खुटाळ, उपाध्यक्ष स्नेहा राणे, सुधीर पगार, तंत्र संचालक डी. के. जोशी, जालंदर चकोर, भूपेंद्र ठाणेकर, पर्ण माळी, पी. बी. पाणीग्रही आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)