रत्नागिरीत येत्या शनिवारपासून राज्यस्तरीय काजू परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:52 PM2023-02-07T15:52:48+5:302023-02-07T15:53:19+5:30
सर्वांगीण चर्चा होणार
रत्नागिरी : काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रियाधारक यांना उभारी मिळण्याकरिता काजू प्रक्रियाधारक संघातर्फे शनिवार, ११ व रविवार, १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत राज्यस्तरीय काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव संदेश पेडणेकर उपस्थित होते.
गेली पाच वर्षे, काजू प्रक्रियाधारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काजू कारखानदारांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समिती अहवालाची अंमलबजावणी व्हावी, नियमित शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकांना बँकेच्या जाचक अटींमधून मुक्तता मिळावी,
पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून काजू बीचे संकलन व्हावे, काजू कारखानदारांना वर्षभर काजू बी पुरवठा व्हावा यासाठी काजू बोर्डामार्फत तरतूद व्हावी, या विविध मागण्या मांडून संघटनेने वेळोवेळी शासनाकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
परिषदेसाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत उपस्थित राहणार असल्याचे बारगीर यांनी सांगितले.
सर्वांगीण चर्चा होणार
या परिषदेमध्ये लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, तसेच काजू उद्योजकांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.