चक्रीवादळ आपत्ती निवारणाची राज्यस्तरीय रंगीत तालीम, रत्नागिरीतील 'या' गावांचा समावेश
By शोभना कांबळे | Published: November 1, 2023 06:56 PM2023-11-01T18:56:38+5:302023-11-01T19:17:25+5:30
रत्नागिरी : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत ...
रत्नागिरी : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच गावे निश्चित करण्यात आली आहेत.राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिली.
चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने बुधवारी (दि. १ रोजी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक निलेश माईनकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील या ५ गावांमध्ये ९ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात येणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरी वस्तीचे स्थलांतरण, करावयाची कार्यवाही, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.