रत्नागिरीत २६, २७ रोजी राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

By मेहरून नाकाडे | Published: January 25, 2024 03:48 PM2024-01-25T15:48:05+5:302024-01-25T15:48:24+5:30

टेबल टेनिस हा जगातील दोन क्रमांकाचा फास्टेस्ट खेळ

State Level Veterans Table Tennis Tournament in Ratnagiri on 26th, 27th | रत्नागिरीत २६, २७ रोजी राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

रत्नागिरीत २६, २७ रोजी राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एसएएस स्पोर्ट्स यांनी २६ व २७ जानेवारी रोजी केले आहे. उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे या स्पर्धा होणार असून राज्यभरातून १५० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतून राज्याच्या संघाची निवड केली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. २७ जानेवारीला रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक व उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वेटरन्स टेबल टेनिस कमिटी, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि ओम साई स्पोर्टस् अॅकॅडमीचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. शिल्पा जोशी, श्रुती कानडे-जोशी व आशा चव्हाण यांच्या एसएएस स्पोर्ट्सतर्फे दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा प्रथमच रत्नागिरीत ही स्पर्धा होणार असून पुढील काही वर्षे अशी स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत महिला व पुरुष एकेरीमध्ये ३९, ४९, ५९, ६९, ७४ वर्षावरील वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच स्मार्ट ग्रुप, क्लेव्हर ग्रुप या ३९ व ४९ आणि ५९ वर्षावरील वयोगटासाठी ग्रुपच्या स्पर्धाही यात होणार आहेत. ७५ वर्षावरीलही ६ स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा आस्वाद रत्नागिरीतील शालेय खेळाडूंनीही घ्यावा. कारण अनेकदा मोठ्या स्पर्धा मुंबई, पुण्यात होत असतात.

टेबल टेनिस हा जगातील दोन क्रमांकाचा फास्टेस्ट खेळ आहे. टेबल टेनिस खेळायची मज्जा मुलांना येते. या स्पर्धेकरिता आनंद जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याची माहिती शिल्पा जोशी यांनी दिली. यापूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक प्राप्त करून देणाऱ्या १४ खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेनिमित्त करण्यात येणार आहे. जूनमध्ये ११ ते १९ वयोगटातील मुलांसाठीही स्पर्धा रत्नागिरीत आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Web Title: State Level Veterans Table Tennis Tournament in Ratnagiri on 26th, 27th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.